छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कृतिदल (एएनएफएफ) स्थापन करण्यात येत आहे. मराठवाड्यात त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे. या संदर्भातील माहिती सांगताना भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तथा अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी एएनएफएफचे पथक स्थापन करण्याचे कामकाज सुरू झाले असल्याचे येथे सांगितले.
एएनएफएफ पथकामध्ये ग्रामीण आणि शहरी, असे दोन भाग करण्यात येणार आहेत. त्यामध्ये २० ते ३० पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरी भागासाठी १२ तर ग्रामीण भागासाठी १६ कर्मचाऱ्यांची निवड केली जात आहे. या पथकाला संबंधित जिल्ह्यात कुठेही, कधीही छापा टाकून कारवाई करता येणार आहे. त्यांना बंदोबस्तासारखे अन्य कुठल्याही प्रकारचे कामकाज नसणार आहे.
पथकाच्या कामकाजाच्या रचनेबाबतचा एक आराखडा तयार केला जात आहे. पथकावर नियंत्रण किंवा कामकाज जिल्ह्या-जिल्ह्यात कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालेल, याची जबाबदारी निश्चित करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांबाबतही लवकरच कळवण्यात येणार आहे. त्याचे स्वरूप आठवडाभरात ठरणार आहे. पथकाला एम.बी., बटण, व्हाईटनरसह काही अमली पदार्थ, औषधी दुकानातील काही औषधांचाही वापर नशेसाठी केला जात असल्याच्या संदर्भाने माहिती घेऊन प्रशिक्षित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एएनएफएफ पथकात काम करण्यासाठी इच्छुक व कारवाईचा अनुभव असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या आहेत. त्यांना नशेशी संबंधित पदार्थ ओळखण्यासह अन्य प्रकारच्या माहितीसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. – डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस मुख्यालय
चार जिल्ह्यांतील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
अवैध गांजा, अमली पदार्थासह इतर गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भाने आढावा घेणारी एक बैठक छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात मंगळवारी घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक अनुक्रमे डॉ. विनयकुमार राठोड, अजयकुमार बन्सल, नवनीत काॅवत व धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, संभाजीनगरच्या अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपस्थित होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घेतलेली बैठक सायंकाळपर्यंत चालली.