छत्रपती संभाजीनगर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रातून महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा संदेश गेला असून, केंद्र व राज्य सरकारची प्रतिमा उजळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळास ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्ष आता वकील, डाॅक्टर, उद्योजक आदी प्रतिष्ठित घटकांपर्यंत पोहोचणार आहे. त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात बीडमध्ये ‘प्रबुद्ध-संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची निर्माण झालेली प्रतिमा सांगण्यात येणार आहे. त्यामध्ये अलिकडचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हा प्रमुख मुद्दा असेल. यातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असून, दहशतवादाला थारा देणाऱ्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही, अशी मोदी सरकारची भूमिका मांडण्यात येणार आहे. देशातील आणि त्यातही महाराष्ट्राच्यी सीमावर्ती भागातील नक्षलवादही मोडून काढण्यात आल्याकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या पार्श्वभूमीवर आता जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून, संरक्षण क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्नही दृष्टिपथात आहे. देश वेगवेगळ्या पातळ्यांवर विकासात आघाडीवर असून, हाच संदेश घेऊन समाजातील डाॅक्टर, वकील, उद्योजक, यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम भाजपच्या संघटनात्मक पातळीवरून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
बीडमध्ये येत्या दोन दिवसात प्रबुद्ध संवादाचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. १० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे पदाधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळाही घेण्यात आली. १२ जून रोजीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे.शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप.
घरकुलांचे वाटपाचे उद्दिष्ट
मागील आठवड्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई पंचायत समिती, ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिवाळीपर्यंत नवीन घरकुलाचे काम पूर्ण करून त्यांचे वितरण करण्याविषयीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दिवाळीपूर्वी प्रत्येक घरकुल लाभार्थ्याच्या हातात चावी द्यावी, असे त्या म्हणाल्या आहेत. देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार घरकुले देण्याचे अनेक ठिकाणी उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.