छत्रपती संभाजीनगर : ‘कळीदार कपुरी पान… कोवळं छान, केसरी चुना’ असे म्हणत विडा खाण्याचा विचार असेल, तर आता जरा अधिक पैसे मोजावे लागतील, कारण विडा महागला आहे. हवामान बदलामुळे पानाची आवक कमी झाली आहे. परिणामी पानाच्या विड्याचे दरही २५ रुपयांपासून पुढे गेले आहे. पान जमवायचे असेल, तर अधिक पैसे मोजावे लागत आहेत. परगावी पाठवल्या जाणाऱ्या कलकत्ता पानाचे दर तर शेकडा हजार रुपयांपर्यंत वधारण्याची शक्यता आहे.
पान खाण्याचा शौकीनपणाचा छत्रपती संभाजीनगरला ऐतिहासिक वारसा! घर, समारंभातील गोड-धोड जेवण किंवा हाॅटेलातील पार्टी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतल्यानंतर पान खाणे ही शहराची रीत. येथे पानाच्या टपऱ्या तर आहेच; शिवाय पानाची दुकाने आहेत. विविध रंगांतील गोड चटणी आणि लालचुटूक चेरी, गुलकंदाच्या पानाचा मोह पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पानाची आवक अधिक. शहरात पानाच्या दोन हजार करंड्या येतात. त्याला डाग म्हटले जाते. आठवड्याला येणाऱ्या पानाचे दर वाढले; मात्र मागणी काही घटली नाही. उलट दीपावलीच्या उत्साहात पान खाणाऱ्यांची संख्या वाढली. आता एका विड्याचा दर २५ रुपयांपासून पुढे सुरू होतो. खास शाही पानाची ५०० रुपयांपर्यंतही विक्री होते. अतिवृष्टीचा फटका विविध ठिकाणच्या पानमळ्यांना बसला असून, नागवेली कर्पुरीसह कलकत्ता पानांचा दर वधारला.
त्यात २८ व २९ ऑक्टोबरला अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा कलकत्ता पानांच्या मळ्यांसाठी ख्यात असलेल्या पश्चिम बंगालला बसणार आहे. मागील आठवडाभरापासून कलकत्ता पानाच्या दरात शेकड्यामागे दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाली आहे. सध्या कलकत्ता पानाचा दर शेकडा ५०० रुपये आहे. ते दर शेकड्यामागे आणखी तीनशे ते चारशे रुपये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागवेलीच्या साध्या, कर्पुरी पानाच्या दरातही शेकड्यामागे दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. साधे पानही ३०० ते ५०० रुपये शेकडा असे आहे. शहरात कलकत्ता पानाचे दोन ते तीन हजार डाग (मोठी करंडी) दर आठवड्याला येतात. एका डागामध्ये २ हजार पाने असतात, असे औरंगपुऱ्यातील सावित्रीबाई फुले भाजी मंडईतील ठोक पानविक्रेते शेख रहीमभाई तांबोळी यांनी सांगितले.
सप्टेंबरच्या अखेरीस व ऑक्टोबरच्या सुरुवातील अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोलकता आणि दक्षिण बंगालमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनापूर, हावडा, दक्षिण परगणा या जिल्ह्यांची पानमळ्यांमुळे देशभर ओळख आहे. पानमळ्यांना अधिक पाणी लागत असले, तरी अतिवृष्टी, वादळ-वाऱ्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याने ‘विडा रंगेल, पण जरा अधिक पैसे मोजले तरच’ अशी स्थिती आहे.
दर हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
हिवाळ्यात दर वर्षी कलकत्ता, कर्पुरी पानांचे दर वाढलेले असतात. थंडीमुळे पाने लवकर उमलत नाहीत. त्यासाठी काहीशी उष्णता लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पानमळ्यांना फटका बसल्याचे सांगितले जात आहे. यंदा मात्र, कलकत्ता पानाचा दर शेकडा हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.- मनोज रामदासी,पान विडा व्यावसायिक
