छत्रपती संभाजीनगर : ‘सिंचना’तील अपहाराचे भांडवल करून राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपच्या काळात काही निधी मिळाला पण कामाची गती काही राखला आली नाही. कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी एक पाऊल पुढे आणि दोन पाऊल मागे अशीच स्थिती दिसून येत आहे. निधीची तरतूद आणि मनुष्यबळ दोन्ही बाजूने सुरू असणाऱ्या अर्धवट सिंचन प्रकल्पाचा आता आढावा कोणी घेत नाही.

दुष्काळी मराठवाडय़ाच्या विकासात महत्त्वाचे पाऊल म्हणून कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी ४ हजार ८१७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंचनास उपयोगी पडावे म्हणून सात अब्ज घनफुट पाणी मराठवाडय़ात आणले जाणार आहे. त्या कामासाठी निधीही मंजूर करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूरजवळ बोगदाही तयार करण्यात आला आहे. काम सुरू आहे. पण त्याची गती काही वाढलेली नाही. आतापर्यंत या प्रकल्पासाठी ८४८२.७३ कोटी रुपयांपैकी ३५४७.४६ कोटी रुपये खर्च झाला आहे.

किती निधी आवश्यक?

  • पुढील तीन वर्षांत उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी २०२३-२४ मध्ये १२५२.४० कोटी रुपये, २०२-२५ मध्ये १९८३.८८ कोटी रुपये, २०२५-२६ मध्ये १६९८.९९ कोटी असा ४९३५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
  • यातील नीरा-भीमा जोड बोगद्याचे काम आणि त्याला लागणारा खर्च यात अद्यापि तरतूद झालेली नाही. ’ उपसा सिंचन क्र. २ या उस्मानाबाद जिल्ह्यातील टप्प्यासाठी निधी खर्च झाल्यास उमरगा, लोहारा, तुळजापूर या तालुक्यांत ७८६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
  • या प्रकल्पाचे एक पाऊल पुढे आणि दोन पाऊल मागे असा खेळ गेली सात वर्षे सुरू आहे. त्यामुळे सिंचनाच्या नवनव्या घोषणा अमलात कशा येतात, हे दिसून येत आहे.