छत्रपती संभाजीनगर – शासकीय योजनेंतर्गत केलेल्या दोन वेगवेगळ्या कामाचे देयक दोन कोटी रुपये काढल्याचा मोबदला म्हणून प्रत्येकी तीन-तीन टक्के मिळून सहा टक्क्यांनी १२ लाख रुपये लाचेची मागणी करून प्रत्यक्षात सहा लाख रुपये घेताना बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत इंद्रजित चव्हाण यांना गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चंद्रकांत चव्हाण यांच्या माजलगाव येथील पिताजी नगरातील निवासस्थानी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या घटनेतील तक्रारदार ३० वर्षीय आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजनेअंतर्गत  नगरपरिषद माजलगावातील केलेल्या सिमेंट रस्त्याचे कामाचे देयक दोन करोड काढल्याच्या मोबदल्यात ३ टक्के असे सहा लाख रुपये व राहिलेल्या उर्वरित कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करून देण्यासाठी सहा लाख रुपये, असे एकूण १२ रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तशी लेखी तक्रार संभाजीनगरच्या लाचलुचपत कार्यालयाकडे नोंदवण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने  १० जुलै रोजी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष मुख्याधिकारी चंद्रकांत इंद्रजीत चव्हाण यांच्याकडे त्यांचे घरी पिताजीनगरी येथे पाठवून लाचेच्या संदर्भाने पडताळणी केली. तेव्हा चंद्रकांत चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे शासकीय कामासाठी बारा लाख रुपये लाच रकमेची मागणी करून, त्यातील ५० टक्के म्हणजे सहा लाख तात्काळ घेऊन येण्याचे सांगितले व उर्वरित सहा लाख रुपये ११ जुलै रोजी देण्याचे ठरले होते. सहा लाख रुपये लाचेच्या रकमेसह चंद्रकांत चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच  अंग झडतीत ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, मुख्याधिकारी नगरपरिषद माजलगाव असे ओळखपत्र आढळून आले. आरोपींचा  मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण, विश्लेषण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे व आरोपी यांची घरझडती प्रक्रिया सुरु आहे, असे सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी केशव दिंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिलीच मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांची मागील आठवड्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या माधुरी केदार-कांगणे  यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावात केलेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली.