छत्रपती संभाजीनगर : सैन्य दलात कॅप्टनपदी कार्यरत असल्याचे भासवून लष्करी गणवेषात फिरणाऱ्या महिलेविरुद्ध दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी दुपारी गुन्हा नोंदवला. रुचिका अजित जैन, असे त्या महिलेचे नाव असून, अंमलदार महेश घुगे यांनी याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी सैन्य दलाकडून चौकशी होऊन ठरेल, पुढील कारवाईची दिशा असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या तक्रारीनुसार रुचिका जैन यांच्याकडे लष्करी गणवेश, त्यावर कॅप्टनपदाच्या तीन चांदण्या खांद्यावर, “पॅरा” लिहिलेले व दंडावर “स्पेशल फोर्स” असे लाल अक्षरात धाग्यांनी विणलेले नाव आढळून आले. तसेच कॉम्बर्ट टोपी, काळ्या रंगाचे दोन पट्टे, “रुचिका जैन” असे लिहिलेली नावपट्टी, छातीवर झळकवण्यात येणारे चार पदक, आर्मीचे ओळखपत्र, पायमोजे या वस्तू आढळून आल्या. तसेच कॅन्सर मुक्त समाज महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे मानपत्र, विविध संघटनांकडून झालेल्या गौरवाचे पुरस्कार, पिस्टल ५.५ एमएम – ज्यावर विनापरवाना वापरण्यायोग्य, असा लिहिलेला मजकूर, “६५ स्पोर्ट्स” लिहिलेले लांबनळीचे रायफल, असे साहित्य रुचिका जैन यांच्या धरमपूर येथील घरातून जप्त करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रुचिका जैन या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील रहिवासी असून त्यांना पती, मुलगा व एक विवाहित मुलगी, असा परिवार आहे. त्या मागील चार-पाच वर्षांपासून दौलताबादजवळील धरमपूर येथील गट क्र. २५ येथे वास्तव्यास आहेत. आपण सैन्य दलातील कॅप्टन असल्याचे त्या सांगत असल्याने नामांकित संस्थांमध्येही रुचिका यांना निमंत्रित केले जायचे, अशी एक माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.