छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेस मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. शेट्टी यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि शेतकऱ्यांकडून सुरू असलेला तीव्र विरोध पाहता, शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने तूर्तास स्थगिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. विविध तीर्थक्षेत्रांना या मार्गाने जोडण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित महामार्गाच्या मोजणीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला विरोध करीत एकच जिद्द, शक्तिपीठ महामार्ग रद्द, अशी घोषणाबाजी केली. सलग तीन दिवसांपासून विविध ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन लावून धरले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी जात, आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख आदींची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया तूर्तास थांबविली जात असल्याचे जाहीर केले. राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि शेतकरी संघटनेचे रवींद्र इंगळे उपस्थित होते.