छत्रपती संभाजीनगर : भरधाव प्रवासी वाहनाने दुसऱ्या प्रवासी वाहनाला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक वाहन उलटल्याने ३४ प्रवासी जखमी झाले. औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे ही घटना घडली.
कृष्णा ट्रॅव्हल्स आणि अभिनव ट्रॅव्हल्सच्या दोन प्रवासी वाहनांमध्ये हा अपघात उजनी ते आशिवदरम्यान घडला. अभिनव ट्रॅव्हल्सच्या वाहनाने दिलेल्या धडकेत कृष्णा ट्रॅव्हल्सची बस उलटली गेली. यात ३४ प्रवासी जखमी झाले. अभिनव ट्रॅव्हलचा क्लिनर नामदेव सूर्यवंशी (वय ४०) व नितीन देवरसे या दोघांचा मृत्यू झाला. नामदेव व नितीन हे दोघेही बीदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील रहिवासी होते.
पोलिसांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. दीपक बिरादार, रेणुका जाधव, उमाकांत पवार, अमोल चौधरी, प्रेमाला चोले, विश्वनाथ चोले, शेजल टोणपे, पूजा तेलंग, परशुराम जाधव, श्वेतांत डोंगरगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.