छत्रपती संभाजीनगर : “तुमच्या जवळचे पैसे प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवा. आता दोन मिनिटे डोळे बंद करा. पाहा, एक लाखाचे तीन लाख झाले.” असे सांगत एका भोंदूबाबाने दोघांना अधिक रक्कम जादूने करून देण्याचे आमिष दाखवले. मात्र या पैशातली एकच रक्कम खरी ठेवून उर्वरीत पैसे लहान मुलांच्या खेळण्यातले नोटांचे बंडल असल्याचे लक्षात येताच दोघांनी मिळून भोंदूबाबाला पकडून शुक्रवारी एम सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

शेख शाहरूख (रा. हर्सल) असे भोंदूगिरी करणाऱ्याचे नाव आहे. अमोल ज्ञानदेव भालेराव (२८,रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. अमोलचा नाशिक येथील मित्र सोनू शेजवळ हा मित्र आहे. शेजवळ याने अमोलला फोन करून बुलढाणा येथील शाहरूख हा जादूने एक लाखाचे तीन लाख रुपये करून देतो, असे सांगितले. तू आणि मी दोघे मिळून त्याला एक लाख रुपये देऊ, तीन लाख रुपये घेऊ, असा प्रस्ताव शेजवळ याने अमोलसमोर ठेवला. त्यानंतर शेजवळ हा १६ मे रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरला आला. दोघांनी मिळून एक लाख रुपये जमवले. शाहरूखला फोन केला. शाहरूखने त्यांना चिकलठाणा विमानतळाजवळील शिवनेरी हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात बोलावले. दोघे सायंकाळी ७ वाजता तिथे गेले. मैदानात दोघे जण दुचाकीवर बसलेले होते. त्यांनी शाहरूख कोण असे विचारले, शाहरूखने स्वत:ची ओळख करून देत, पैसे आणले आहे का, अशी विचारणा केली. दोघांनी ५०-५० हजारांचे दोन बंडल त्याच्या हातात दिले. त्याने ते पैसे त्याच्याजवळील प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून दोघांना दोन मिनिटे डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर शाहरूखने पॉलिथीन बॅगमधून पॉलिथीनच्या रॅपरमध्ये गुंडाळलेले एक बंडल काढले व हे घ्या तीन लाख रुपये असे म्हणत त्यांच्या हातात दिले. पॉलीथीन काढून बंडल उघडून पाहत असतानाच, शाहरूखचा साथीदार दुचाकीवर पळून गेला, तर शाहरूखनेही धूम ठोकली, हे पाहून दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. बंडल उघडून पाहिले असता, त्यात वर ५०० रुपयांची असली नोट व खाली खेळण्यातील नोटा दिसून आल्या. पळून गेलेल्या साथीदाराचे नाव गुड्डू बगदादी असल्याचे शाहरूखने त्यांना सांगितले. अमोल व सोनू याने शाहरूखला एम सिडको पोलिसांच्या स्वाधीन करत, फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याकडे घबाड सापडले; एक कोटी रोख, ७२ लाखांचे दागिने व स्थावर मालमत्ता

हेही वाच – छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ५० लाखांची रोकड पकडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल भालेराव यांची रॉयल इन्फोटेक नावाची फर्म आहे. आरोपी शाहरूखने अशाचप्रकारे किती जणांची फसवणूक केली, याचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.