छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांपुढे जगण्याचा आणि पुन्हा उभं कसं राहायचे, याचा प्रश्न जसा त्यांच्यापुढं उभा आहे, जवळपास तशीच घुसमट महानगरांमध्ये स्पर्धा परीक्षेची, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांचीही सुरू आहे. ‘महिन्याकाठी दोन-चार फोनं केल्यानंतर कसं-बसं येणारे तीन-चार हजार रुपये आता येतील की नाही, याची चिंता लागली आहे,’ हे सांगतानाही तरुणांचा आवाज खोल गेलेला.

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक, टिव्ही सेंटर हा अभ्यासिकांनी वेढलेला भाग. यातीलच एका अभ्यासिकेत बसून पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुरजित पवार हा जालन्यातील मंठ्याजवळच्या वाघोडा तांडा येथील. गावात तुफान पाऊस झाला तेव्हा सुरजितची भविष्याची चिंता वाढली. तो म्हणाला, घरच्या परिस्थितीमुळे मोबाईल फोनचे साडेतीनशे रुपयांचे रिचार्जही आम्ही तीन-तीन महिने करत नाहीत.” सुरजितच्या पालकांकडे नऊ एकर शेती. पण कोरडवाहू. पावसाने पिकं पाण्यात. सुरजितसोबतच असलेला विलास सुरनर हा परभणीच्या पालम तालुक्यातील. “काळजी तर चांगलीच लागली. पन्नास रुपयांचे दरवेळेला नवीन कार्ड घ्यायचे. त्यातच बोलणे आणि एक जीबी डेटा मिळतो, त्यातच समाधान मानायचे.”

परिस्थिती सारं शिकवतेय, हे सुरजित आणि विलासचे एका सुरातले वाक्य. जालन्याजवळचा शरद राठोड हा धांडगाव तांड्यावरचा. येथे परीक्षेची तयारी करतो. सोबतच बहीणही असते. शरद सांगतो, “आम्हा भावंडांना दहा हजार रुपये महिना येतो. त्यातच खोली, जेवण, अभ्यासासाठी लागणारे साहित्य, अतिरिक्त आहार, कपडा-लत्ता, असं सारंच भागवावे लागते. गावाकडचे साेयाबीनचे पीक, कांद्याचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले. पैसे कुठल्या तोंडाने मागावे, अशी चिंता लागली आहे.” स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये वेळेत न होणाऱ्या परीक्षा, परीक्षांमधील घोटाळे, याविषयी प्रचंड संताप दिसून येतो. किरण पवारने, “परीक्षेचे एक निश्चित कालनिर्णय तयार झालेले पाहिजे. उमेदवारांना जगण्याच्या परिस्थितीसह अभ्यासाचेही नियोजन करावे लागते. त्यासाठी एक निश्चित धोरण ठरवले पाहिजे.” वैजापूरजवळच्या खंडाळा गावच्या अलका थोरात येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

त्या सांगतात, “प्रत्येक परीक्षेच्यावेळी स्वतंत्र अर्ज भरावा लागतो. त्यासाठी स्वतंत्र हजार-हजार रुपये शुल्क भरावे लागते. सर्व परीक्षा एका छताखाली आल्या पाहिजेत. आर्थिक झळ सहन होत नाही.” मुलांना धावण्यासाठी एक मैदानही धड नाही. काही मैदानावर त्यांच्याकडून महिन्याकाठी तीनशे रुपये घेतले जातात, अशाही तक्रारी असून, त्याविषयी प्रचंड नाराजीही त्यांनी व्यक्त केली. विशाल राठोड म्हणाला, “स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मैदानावर दररोजच जावे लागते. परंतु, मैदानावर शुल्क आकारले जाते.

बुटापासून ते जेवणापर्यंतच्या प्रत्येक पावलावर त्याला तडजोड करावी लागते. काही दुखलं-खुपलं तर मेडिकलवर जाऊन एखादी गोळी घेऊनच आजारपण अंगावर काढावं लागतंय. राहायच्या खोल्या मिळण्यासाठीही बरीच कसरत करावी लागते. मुलांच्या जेवणासाठी एखादी योजना काढायला हवी.” तर जालना जिल्ह्यातील सूरज उंबरकरने परीक्षेचे चलन, शुल्कासाठीही एक धोरण ठरवणे आवश्यक असून, वर्षाकाठच्या पाच ते सहा परीक्षांसाठी सहा-सहा हजार रुपये वेगळे मोजावे लागतात. प्रत्येकालाच ते शक्य नाही. अन्य राज्यांमध्ये एकाच चलनात अनेक परीक्षा देण्याची व्यवस्था आहे.”