लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूलीचे काटेकोरपणे नियोजन करूनही यावर्षी पाणीपट्टीतून मनपाला १८३ कोटी ५२ लाख रुपये मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची वसूली २ कोटी रुपयांनी कमी झाली. मागील वर्षी १८५ कोटी ३३ लाख रुपये करातून उत्पन्न मिळाले होते. मालमत्ता कराच्या रक्कमेत आणखी वाढ होईल असे सांगण्यात येत आहे.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूलीचे ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. दर आठवड्याला कराच्या वसूलीचा आढावा घेतला जात होता. मनपा प्रशासकांनी कर वसूलीसाठी कर्मचार्‍यांना गुगलशिट आणि मालमत्तांचे वाटप देखील केले. तसेच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी मालमत्ता कराच्या वसूलीसाठी झोन कार्यालयाचे सहायक आयुक्त आणि कर अधिक्षक यांच्याकडून दैनंदिन आढावा घेतला जात होता. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे ८ हजार २५६ मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. काही प्रकरणे विधी सेवा कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

मालमत्ता कराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दर आठवड्याला कर निर्धारण शिबीर घेण्यात आले. महाकर अदालत भरविण्यात येऊन त्यामध्ये प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तरी देखील कराच्या वसूलीमध्ये वाढ झाली नाही. वर्षभर वसूलीसाठी मेहनत घेऊनही ३१ मार्चला मालमत्ता करापोटी १५७ कोटी ३३ लाख आणि पाणीपट्टीतून २६ कोटी १९ लाख रुपये वसूल झाले. दोन्ही मिळून कराची वसूली १८३ कोटी ५२ लाख रुपये झाली आहे. २०२३-२४ या मागील आर्थिक वर्षात मालमत्ता करातून १५७ कोटी २६ लाख आणि पाणीपट्टीतून २८ कोटी ७ लाख रुपये असे एकूण १८५ कोटी ३३ लाख रुपये मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात उपायुक्त अपर्णा थेटे म्हणाल्या की, मालमत्ता कर, पाणीपट्टीची वसूली १८३ कोटी इतकी झाली असली तरी त्यामध्ये आणखी वाढ होईल. शासकीय कार्यालयाकडून अद्याप कराची वसूली मिळालेली नाही. कराच्या वसूलीचा हा आकडा २०० कोटीपेक्षा निश्चत जास्त असू शकेल.