छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत ‘वोट जिहाद’ करत काही मूठभर लोकांनी संस्कृतीवरच आक्रमण करण्याचा घाट घातला होता. त्याला उत्तर देण्यासाठी पुढे राज्यातील धार्मिक व संतशक्तीला आव्हान केले. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरला बेट येथे गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.

या परिसरात नेहमीच भक्तिरसाने अनेक भाविक येतात. त्यामुळे या भागात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून आराखडा तयार करण्यात आला आहे. १०९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. येत्या काळात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगरपर्यंत पाणी आणून ते मराठवाड्यात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे सूतोवाचही फडणवीस यांनी केले.

मी पुन्हा येईन

गंगागिरी महाराजांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या निवासस्थानी यावे असे वाटत हाेते. पण आधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी येऊ अशी भूमिका मांडली. कारण संतशक्तिचरणी नतमस्तक व्हायचे होते. या वर्षी जसा हरिनाम सप्ताहानिमित्त आलो आहे, तसेच पुढील वर्षीही येईन. आणि मी पुन्हा येईन असे म्हटल्यावर मी येतोच, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काळात असे काम करून दाखवू, की लाडक्या बहिणींना आम्हाला मतदान केल्याचे वाईट वाटणार नाही.