शेतकरी मारहाण प्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करा, या मागणीसाठी शिवसेनेकडून शुक्रवारी सिल्लोड यथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. सत्तार यांच्या विरोधात शेकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेकडून हा ‘रास्ता रोको’ करण्यात आला.

सिल्लोड येथील शेतकरी मुक्तार सत्तार यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात  शेतकऱ्याला शिवीगाळ करताना हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी बजरंग दलाच्या तक्रारीवरूनही सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली. त्या शेतकऱ्याने सत्तार जमीन बळकावण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणावर स्पष्टीकरण देताना सत्तार म्हणाले होते की, संबंधित जमीन दलित समाजातील सखाराम कल्याणकर यांची आहे. तक्रारदार त्यांना ही जमीन परत देण्यासाठी तयार नाही. ज्या दिवशी घटना घडली. त्या दिवशी त्या जमिनीलगत असलेल्या आमच्या जमिनीत पेरणी सुरु होती. तेव्हा वाद सुरु झाला. त्यामुळे मी पोलिसांना बोलवून या भांडणात पडलो. कल्याणकर यांना मारहाण सुरु झाली होती. मी मध्ये पडलो नसतो तर त्यांचा जीव गेला असता. त्यांच्या सोबत वाद घातला असल्यामुळे मी शिव्या देऊन त्यांना हुसकावून लावले. जमीन बळकवण्याचा माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो निराधार आहे.