वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे स्पष्टीकरण

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद: मुंबई आणि पुणे येथील करोनाबाधितांची संख्या तशी अधिक आहे. मात्र, राज्यातील इतर शहरांमधील स्थिती नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसात रुग्णालयातील आया, परिचारक यांना होणारा संसर्ग लक्षात घेता ‘रॅपिड टेस्ट’चे सूत्र आधी त्यांना लागू करण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

राज्यात ‘पीपीई’ आणि मास्कची कमतरता नाही, मात्र तरीही या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाचा वेग अधिक वाढवायला हवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वत्रिक चाचणी घेण्यासाठी तेवढय़ा प्रमाणात किट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, चाचणीमुळे कुठेही अडचण झालेली नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ातील स्थिती काळजी करण्यासारखी नाही. मुंबई आणि पुणे या दोन शहरात जेथे अधिक लागण झाली आहे, त्या भागातील हालचालींवर अधिक नियंत्रण आणले जात आहे. मात्र, पुणे येथून किट बनविण्याचा दावा एका कंपनीने केला असला तरी सर्व मानके पूर्ण करून तेथून चाचणीसाठी किट घेण्यास काहीसा वेळ लागू शकतो. या कंपनीने केलेल्या किटला अद्यापि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता मिळालेली नाही.

केंद्र सरकारकडून ‘पीपीई’ खरेदी सुरू आहे. त्यांच्याकडूनही साहित्य मिळणार आहे. आता जिल्हास्तरावर खरेदीचे अधिकार दिले असून विविध कंपन्यांबरोबर दरकरार केले जात आहेत.

मुंबई आणि पुणे येथे कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येत आहे. शीघ्र चाचणीची परवानगी दिली तर ज्या भागात अधिक रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात अधिकच्या चाचण्या केल्या जात आहेत. काही मैदानेही ताब्यात घेण्यात आली आहेत. आता केंद्र  सरकारकडूनही साहित्य मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लातूरसारख्या जिल्ह्य़ात जे रुग्ण आहेत ते बाहेरचे आहेत, मात्र तेथे पुरेसा पीपीई आणि मास्कचा साठा आहे. गोळ्यांची आता निर्यातही केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात औषधे कमी पडणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

उपकरणांच्या उत्पादनाचा वेग वाढवा

सर्व ठिकाणी सर्व वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता आहे का, याची पार्श्वभूमी तपासली जात आहे. काही ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे. खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे किट मागत आहेत. त्याची गरज आहेच, पण या उपकरणांच्या उत्पादनाचा वेग वाढवला पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.