हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची पाचव्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून लागलेली गैरहजेरी त्यांच्या रझाकारी मानसिकतेचा अभिन्न भाग आहे, अशी टीका मंगळवारी वेगवेगळ्या व्यक्ती व राजकीय पक्षांनी केली आहे.

सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या बछडय़ांच्या नामकरण सोहळ्यात पत्रिकेवर नाव नाही म्हणून भांडणारे एमआयएमचे कार्यकर्ते स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यास येत नाही यावरून त्यांचे निजामप्रेम दिसत आहे, अशी टीका केली जात आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती लढा उभारला गेला. त्या लढय़ाची प्रतारणा सातत्याने एखादा पक्ष करत असेल तर त्यांचे निजामप्रेम दिसून येते, अशी प्रतिक्रिया उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली.

शासकीय कार्यक्रम होता तरीही ते आले नाहीत. कारण त्यांचे रझाकारावर प्रेम आहे हेच दिसून येते, असेही ते म्हणाले. इतिहासातील ती एमआयएम आणि सध्याची मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन ही राजकीय संघटना वेगवेगळी असल्याचा दावा ओवेसी यांनी यापूर्वी केला होता, पण त्या संघटनेशी या पक्षाचा संबंध नाही, असे एमआयएमच्या नेत्यांच्या कृतीतून दिसून आलेले नाही. इतिहासात इत्तेहादुल मुसलमिन ही संघटना निजामाने राजकीय अर्थाने वापरली. त्याचे सैन्य रझाकार म्हणून ओळखले जात.

‘मराठवाडा’ दैनिकाचे साक्षेपी संपादक अनंत भालेराव यांनी लिहिलेल्या अग्रलेखांमधून  निजामाच्या पूर्वीच्या संघटनेची माहिती आणि त्याविषयीचे मत व्यक्त केले होते. या संघटनेच्या सैन्याला रझाकार म्हटले जायचे. निजामाचे हे सैन्य ४० हजारांच्या आसपास होते. मात्र, त्यांनी मराठवाडय़ासह तेलंगणात उच्छाद मांडला होता. त्या संघटनेशी या पक्षाचा संबंध नाही, हे दाखवून देण्यासाठी म्हणून खासदार जलील यांनी एकदा तरी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याला या वेळीही खासदार जलील यांनी धुडकावले.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘इम्तियाज जलील किती धर्माध आहेत, हे त्यांच्या या कृतीतून दिसून आले आहे. ज्या स्वातंत्र्यलढय़ासाठी अनेकांनी आहुती दिली, त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाला येणे आवश्यक होते, पण त्यांनी ते टाळले. हे रझाकारी प्रेम आहे.’