छत्रपती संभाजीनगर : खासगी कुरिअर कंपन्यांप्रमाणे ‘पार्सल बिझनेस’वर लक्ष केंद्रित करून टपाल विभागही विकसित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा देत स्पर्धेत उतरले आहे. ‘आयटी-२.०’ या नवीन यंत्रणेच्या माध्यमातून कामकाज सुरू झाले असून, यातून आता टपाल विभाग ग्राहकांना ओटीपी, लघुसंदेशासारखी खात्रीशीर आणि विश्वासदायक सेवा पुरवणार आहे. कार्यालयीन बहुतांश कामकाजही कागदविरहित होणार असल्याचा दावा केला जात आहे.
टपाल विभागाचे कामकाज मागील आठवड्यात ऐन राखी पौर्णिमेच्या कालावधीतच ढेपाळल्याची चर्चा सुरू झाली होती. सर्व्हर डाऊनसारखे कारणही सांगितले जात होते. परंतु उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून टपाल विभागात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले होते.
टपाल विभागात यापूर्वीचे कामकाज सॅप प्रणालीद्वारे चालायचे. या प्रणालीमध्ये प्रत्येक टप्प्यावर यूजर आयडी, लॉग-इन पद्धतीचा वापर करावा लागायचा. परंतु आता नवीन ‘आयटी-२.०’सारखे नवीन तंत्रज्ञान विकसित करून त्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आले आहे. टपाल विभागातील कर्मचारी, अधिकारी वर्गाला प्रशिक्षित करण्यासाठी म्हैसूर व बंगळुरू येथे सेंटर फाॉर एक्सलन्स पोस्टल टेक्नॉलॉजी (सीईपीटी) केंद्र आहेत. याच केंद्रातून नवीन ‘आयटी-२.०’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यातून कागदी व्यवहार कमी होऊन ग्राहकांना अद्ययावत सेवा आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही तंत्रज्ञानाद्वारे कार्यालयीन कामकाज करता येणार आहे.
रजा, वैद्यकीय विमा किंवा तत्सम कामे नवीन प्रणालीतूनच करता येणार आहे. विभागाशी संबंधितच यंत्रणेकडून ही सेवा विकसित झाल्यामुळे सॅपसारख्या तंत्रज्ञानावर होणाऱ्या खर्चातही बचत होणार असल्याचा दावा अधिकारी वर्गाकडून करण्यात आला.
टपाल विभागातील यंत्रणेमध्ये नवीन विकसित ‘आयटी-२.०’ तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. विभागाकडूनच ते विकसित करण्यात आले आहे. यामध्ये ओटीपी, लघुसंदेशांची पद्धत असून, ही ग्राहकांच्या विनंतीनुसार असेल. कागदविरहित बहुतांश सेवा असेल. – जी. हरिप्रसाद, प्रवर अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर व जालना</strong>