छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या खुलताबादजवळील कागजीपुरा भागातील शंभर एकर जागेत राज्यातील सर्वात मोठे भंगार केंद्र (स्क्रॅपिंग सेंटर) खासगी भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. राज्यात एकूण तीन ठिकाणी भंगार केंद्र उभारण्यात येणार आहे. पैकी खुलताबादेतील जागा निश्चित करण्यात आली असून अन्य दोन ठिकाणच्या केंद्रांना परवानगी मिळाली, पण त्याबाबतच्या जागेचा शोध घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. खुलताबादेतील ११२ एकरसह महामंडळाची दीडशे एकर जागा पडून असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये २५ जून रोजी प्रकाशित झाले होते.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि परिवहन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ जून रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत भंगारकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कागजीपुरा येथे वाहनचालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ४० वर्षांपूर्वी केंद्र सरकारने दीडशे एकर जागा महामंडळाला दिली होती. परंतु या जागेवर ४० वर्षात काहीही उभारणे शक्य झाले नाही. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाले होते.
केंद्र शासनाद्वारे २०२१ मध्ये रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) नावाने १५ वर्षापेक्षा जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने मोडीत काढण्याचे नवे धोरण तयार करण्यात आले. हे धोरण महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये स्वीकारले असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (एआयएस) च्या अटी शर्तीनुसार भंगार केंद्राला मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात ३ ठिकाणी भंगारकेंद्र उभारण्याची परवानगी मिळाली असून पहिले आणि राज्यातील सर्वात मोठे केंद्र खुलताबादेतील महामंडळाच्या १०० एकर जागेवर सार्वजनिक- खासगी भागीदारीतून उभारले जाणार आहे.
सध्या शासनाच्या परवानगीने राज्यात आठ संस्था भंगार केंद्र चालवत असून त्यांची वर्षाला किमान १००० वाहने मोडीत काढण्याची क्षमता आहे. अशा प्रकल्पांना गती देऊन भविष्यात सर्वाधिक वाहने शास्त्रोक्त पद्धतीने मोडीत काढून एक नवा उत्पन्नाचा स्रोत यातून निर्माण होईल, असा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केल्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने मोडीत (स्क्रॅप) काढून व सुट्या भागांचाही पुनर्वापर होणार नाही, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे भंगार केंद्र एसटी महामंडळ सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर उभारणार आहे. त्याद्वारे उत्पन्नाचा स्रोत एसटीला निर्माण होईल. पहिले केंद्र खुलताबादनजीक शंभर एकर जागेवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, रापम.