|| सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: पैठणीचा ‘ताना-बाना’ जीर्ण-शीर्ण झाला असून करोनामुळे येणाऱ्या अडचणीनंतर उंची वस्त्र घेणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जगणे मुश्किल झालेल्या वीणकर महिलांचे मंजूर पैठणी उद्योजगता समूह केंद्रही महिलांची गटात बेबनाव झाल्याने मार्गी लागले नाही. परजिल्ह्यातून येणाऱ्या साड्या बनविण्याची मागणी पूर्णत: घटली असल्याने आधीच कष्टात जगणारा वीणकर आता नव्याने अडचणीत सापडला आहे. पण रेशीम कोष उत्पादनात मराठवाडा अग्रेसर आहे. राज्यातील एकूण रेशीम उत्पन्नापैकी ५५ टक्के उत्पादन मराठवाड्यातून होत आहे.

पैठण शहरात पैठणीची कारागिरी करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. करोनाकाळात हातावरचे काम संपल्यावर नवीन पैठणी खरेदीसाठी कोणी पुढे आले नाही. औरंगाबादमधील एक व्यापारी दरमहा दोन हजार रुपये द्यायचा त्यावर गुजराण होत असे, असे नंदा जनार्दन जालंद्री यांनी सांगितले.

शासकीय अधिकारी, उद्योजकांच्या पुढाकाराने पैठण येथे ६० महिलांचा एक गट तयार करून पैठणी उद्योजकता कस्टर केंद्र सुरू करण्यासाठी खासे प्रयत्न केले. निवासस्थान आणि कंपनीसाठी जागाही मिळविण्यात आली. पण तो प्रयोग अनुदानात भ्रष्टचार केल्याच्या अफवेमुळे फसला. महिला कारागीर पुन्हा आपापल्या घरीच वीणकाम करू लागल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने अडचणींना सामोरे जावे लागले. करोनाकाळात पैठणी कोण विकत घेणार असा प्रश्न होता. 

एखाद्या साडीचे वीणकाम करण्यापूर्वी धाग्यांना रंग देण्यासाठी येवल्यापर्यंत जाणे शक्य होत नव्हते. औरंगाबादमधील व्यापाऱ्यापर्यंत पैठणी पाठवता येत नव्हती. आता  निर्बंध  शिथील झाले असले तरी पैठणीची हौस करावी अशी एवढे वातावरण वीणकरांसाठी पोषक राहिलेले नाही. एका पैठणीची किंमत २५ हजार रुपयांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत असते.

 विवाह सोहळे आणि सार्वजिनक कार्यक्रमात उंची वस्त्र म्हणून वापरली जाणारी पैठणी विकत घेणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. पैठणीवर संसार चालविणाऱ्या फरजाना, सुनीता, शशीकला, नंदासारख्या अनेक जणींना आता सूत कताई, वीणकाम, रंगकाम ही कामे मिळेनाशी झाली आहेत. ग्रामीण भागातील कष्टकरी वीणकर कलाकारांचा ताना-बाना जीर्ण होऊ लागला आहे. पैठणी उद्योग समूह केंद्रासाठी प्रयत्न करणाऱ्या पुष्पा पोकळे म्हणाल्या, ‘खूप कष्ट घेतले त्या प्रकल्पासाठी पण हाती काही लागले नाही. उलट मनस्तापच झाला.

आता पैठणी खरेदीसाठी फारशी विचारणा होत नाही. कसेबसे  दिवस ढकलत आहेत सारे. आता हौस म्हणून साडी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढायला किती दिवस लागतील, माहीत नाही.’

एका बाजूला पैठणीचे वीणकर अडचणीत आले असले तरी मराठवाड्यातील रेशीम शेती सध्या बहरात आहे. जालना येथे रेशीम कोष खरेदीसह रेशीम व्यापारात तेजी आहे. जालन, औरंगाबाद या दोन जिल्ह्यांत तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. हवामान बदलास हे पीक अधिक पुरक असल्याचे दिसून येत असल्याने रेशीम कोष निर्मिती, अंडीपुंज विकसन केंद्रही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.

पण  रेशीम धागा, कपडानिर्मिती या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. जालना जिल्ह्यात २०१८-१९मध्ये १२५ मेट्रिक टन कोषनिर्मिती झाली होती. त्यात पुढील वर्षी मोठी वाढ झाली. ४५० मेट्रिक टन कोष निर्मितीनंतर धागा तयार करणे त्यापासून तलम वस्त्र तयार करण्याचे काम पुन्हा कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये केले जाते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रेशीम विकास अधिकारी अमोल मोहिते सांगतात.

रेशीम कोषनिर्मिती पर्यंतचा मराठवाड्याचा प्रवास खूप प्रगतीचा आहे. रेशीम कोषापासून धागा निर्मितीसाठी कर्नाटक आणि तामिळनाडूवर अवलंबून राहावे लागते. तेथे काही उद्योजकांनी काम करण्याची गरज आहे. त्यापुढील वीणकाम कारागीर आहेत. पण परिपूर्ण उद्योग समूह विकसित झाल्यास त्याचा परिणाम चांगला होईल.           -अमोल मोहिते, रेशीम विकास अधिकारी जालना

वीणकाम ही एक कला आहे. हे कामही कष्टाचं आहे. पण आता करोनानंतर पैठणी साडी खरेदीदार कमी झाले आहेत. आमचे जगणे अधिक कठीण बनले आहे. – नंदा जालंद्री, यशवंतनगर पैठण