|| सुहास सरदेशमुख 

शिवसेना नेते चंद्रकांत खरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय वाद ‘गद्दारी’ काढण्यापर्यंत गेला. तर भाजपमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशांत बंब यांना ‘ब्लॅकमेल’ करणारा आमदार असे म्हटले. राष्ट्रवादीमध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके रुसून बसले. त्यांची समजूत काढावी लागली. काँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांना मंत्रिपद न दिल्याने जालन्यातील धुसफूस  पुढे आली. सर्वपक्षीय वाद, धुसफूस असा मराठवाडय़ाचा राजकीय पट दिसत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ आणि १० जानेवारी रोजी मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. गावात वाद आणि मुंबईत समेट, अशा राजकीय जोरबैठका सध्या सुरू आहेत.

‘कट्टर’ हा शब्द ‘अचल निष्ठे’च्या पातळीवर घेणारे शिवसैनिक आणि त्यांचे नेते चंद्रकांत खरे एका बाजूला आणि कालपरवा सेनेत आलेले आणि राज्यमंत्री झालेले अब्दुल सत्तार यांच्यातील वाद वर्चस्ववादातून घडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली. जिल्हा परिषदेच्या राजकारणातील वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह पुढे आला असे वरकरणी दिसत असले तरी ज्या  पक्षात सत्तार काम करतात त्या पक्षाशी त्यांचे खटकेच उडतात. काँग्रेसमध्ये त्यांचे कोणाशी पटले नाही. आता शिवसेनेतही त्यांचे तसेच चित्र निर्माण होत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये राज्यात महाआघाडी स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेतील नेत्यांनी भाजपला सत्तेतून दूर ठेवायचे म्हणून काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली होती. तेव्हा अडीच वर्ष अध्यक्षपदाची वाटणी करण्यात आली. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाता-जाता शिवसेनेकडे पाठविण्यात आले. त्यांनीही आनंदाने ‘शिवबंधन’ बांधले. राज्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत संजय राऊत आणि अब्दुल सत्तार हे दोघेच वृत्तवाहिन्यांवर शिवसेनेची बाजू मांडत होते. जणू अनेक वर्ष शिवसेनेतच काम केल्यागत सत्तार यांची भाषा शिवसेनेतील अनेकांना खटकणारी होती. ते अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, अशी त्यांनी प्रतिमा निर्माण करून घेतली. त्यातूनच जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपला शब्द अंतिम असावा, असे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खरे यांनी सत्तार यांना फारसे महत्त्व न देता जिल्हा परिषदेमध्ये महाआघाडीची सत्ता आणण्याचे नियोजन केले. त्याला सत्तार यांनी खीळ घातली. शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांना हाताशी धरून सिल्लोड मतदारसंघातील सहा सदस्यांसह भाजपकडे पाठविले. अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या डोणगावकर यांना भाजपने समर्थन दिले. परिणामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाआघाडी आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना प्रत्येकी ३० मते मिळाली. त्यातून निर्माण झालेला वाद राज्यमंत्री अब्दुल सत्तार गद्दार आहेत, असे म्हणण्यापर्यंत गेला. त्यावर पडदा पडला असला तरी ती धुसफूस कधीही पुन्हा व्यक्त होऊ शकते. कारण मूळ शिवसेनेतील नेत्यांना डिवचले की ते एकत्र येतात आणि सत्तार यांचा स्वभाव पक्षांतर्गत कुरघोडीत अग्रेसर म्हणून राहायला आवडते. पूर्वी काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब थोरात यांच्याशीही त्यांचे जाहीर वाद झाले होते.

भाजपमध्ये आमदार विरुद्ध खासदार

धुसफूस आघाडीत सध्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार प्रशांत बंब यांच्यातील वादही चर्चेत आहे. प्रशांत बंब यांच्याविषयी राज्याच्या विधिमंडळातही तक्रारखोर आमदार अशी चर्चा झाली होती. विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांचा पत्रव्यवहार राज्यभर असतो. तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते. त्यामुळे रस्ते, डांबर यात घोटाळे होतात हे सार्वजनिक सत्य त्यांना जरा अधिकच माहीत आहे, असे चित्र दिसून येते. त्यावरच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आक्षेप घेतले. या माहितीचा उपयोग ते ब्लॅकमेल करण्यासाठी करतात, असा चिखलीकरांचा आरोप आणि त्याला प्रशांत बंब यांनी दिलेले उत्तर याचा सरळ संबंध थेट या विभागातील टक्केवारीशी आहे.

पूर्वी नव्याने बांधकाम मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोर कंत्राटदारांनी ३५ टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागते, असे जाहीर सांगितले होते. त्यामुळे भाजपमधील खासदार आणि आमदारांचा वाद हा नक्की कोणत्या कारणासाठी हे नव्याने सांगण्याची गरज नाही. हा वाद थांबणारा नाही. कारण या विभागाच्या कामकाजात अजूनही तसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे भाजपचा खरा चेहराही उघड झाल्याची चर्चा मराठवाडय़ात होत आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने खदखद

भाजप- सेनेतील वाद उघडकीस येत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील खदखदही बाहेर पडत होती. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्याला मराठा आणि ओबीसी अशी किनार होती. पहिल्यांदा निवडून आलेले धनंजय मुंडे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होतात आणि चार वेळा निवडून आल्यानंतरही काहीच मिळत नाही, अशी ती खदखद त्यांनी बोलून दाखविली. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आपले सहकारी शांत करण्याचे अनेक हातखंडे असल्याने ते बंड मिटले. आता जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गौरंटय़ाल नाराज आहेत. त्यांच्या नगराध्यक्ष पत्नी संगीता गोरंटय़ाल यांच्यासह तीन नगराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये नाराजीची दखल तशी संथपणेच घेतली जाते. मात्र, सध्या मराठवाडय़ात सर्वपक्षीय धुसफूस आहे. त्याला कधी फोडणी बसते आणि ठसकाही निर्माण होतो.