छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील घटक पक्षांमध्ये युती होण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरचा महापौर भाजपचाच होईल, असा दावा त्यांच्या प्रमुख नेत्यांकडून मंगळवारी प्रभागांमधील आरक्षण सोडत होताच करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात मंगळवारी महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या सोडतीमधून प्रभाग रचनेमुळे सर्वांनाच निवडणूक लढण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अनेकांची संधी जाणार असल्याने त्यांच्याही पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र सोडतीच्या ठिकाणी पाहायला मिळाले.
आरक्षण सोडतीमध्ये शहरातील २९ प्रभागांतील ११५ सदस्यांमधून ५८ महिला सदस्य आणि ५७ पुरुष सदस्य राहतील, असे चित्र स्पष्ट झाले. सोडतीच्या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदेगट) यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह इच्छुकांनी हजेरी लावली. यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आरक्षण काढण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. शहरात २९ प्रभाग असून, यातून ११५ सदस्य निवडून द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि निवडणूक आयोगाच्या सूचना आणि राज्य शासनाच्या २० मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार आरक्षण सोडत काढली जात असून, २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ ही असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अनुसूचित जातीची २ लाख ३८ हजार १०५ आणि अनु. जमातीची १६ हजार ३२० ही लोकसंख्या ग्राह्य धरून एकूण लोकसंख्येचा भागले गेले, असे सूत्र यावेळी सांगितले.
त्यानंतर इतर मागासप्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण गृहीत धरून ३१ जागा राखीव करण्यात आल्या. २९ प्रभाग असल्याने प्रत्येक प्रभागात एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव केली. उर्वरीत दोन जागांसाठी अनु. जाती व अनु. जमातीची लोकसंख्या अत्यंत कमी असल्यामुळे सोडण्यात आलेल्या सात प्रभागातून दोन जागा विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या. ३१ जागांमध्ये दोन प्रभागांत प्रत्येकी दोन इतर मागासप्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्या. त्यातून १६ जागा महिलांसाठी चिठ्ठी काढून आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येक प्रभागात एक जागा निश्चित करून एका प्रभागात दोन जागा राहिल्या.
१७ रोजी प्रारूप आरक्षण सोडत प्रसिद्ध
निवडणुकीची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. हे प्रारूप आरक्षण सोडत असून, राज्य निवडणूक आयोगाकडे हा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत प्रसिद्ध करून त्यावर २४ नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरुपात हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर अंतिम आरक्षण सोडत जाहीर केले जाणार आहे. जी. श्रीकांत, प्रशासक.
छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भाजपचाच होणार आहे. युतीच्या संदर्भाने वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. परंतु, महापौर भाजपचाच होईल. समीर राजूरकर, सरचिटणीस तथा शहर निवडणूक प्रमुख, भाजप.
नव्या प्रभागांचा शोध
प्रभाग साेडतीमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजू शिंदे, दिलीप थोरात, कैलास गायकवाड यांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मात्र आता नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. तर माजी महापौर त्रिंबक तुपे, विकास जैन, गजानन बारवाल, माजी उपमहापौर संजय जोशी यांचे प्रभाग आरक्षणापासून सुटले. त्यांना स्वत:च्या प्रभागात लढण्याची संधी मिळणार आहे. दहा वर्षांनंतर हाेणाऱ्या या निवडणुकीत प्रभागातील वॉर्डांना अ, ब, क, ड अशी नावे देण्यात आली आहेत.
