विजयादशमीनिमित्त पर्यटनाच्या राजधानीत वाहन खरेदीचा उत्साह वर्षांगणिक वाढत असल्याचे चित्र गुरुवारी बाजारपेठेत दिसून आले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीत मागील वर्षांच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचा दावा वाहन विक्रेत्यांकडून करण्यात आला. सोन्या-चांदीच्या बाजारातही मुहूर्ताच्या खरेदीची धूम कायम होती. दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे यंदाही प्रामुख्याने उद्योग वर्तुळात अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे सांगितले जात असले, तरी सण-उत्सवाच्या खरेदीत मात्र त्याचे फारसे प्रतिबिंब नसल्याचेच एकूण चित्र आहे.
दुचाकी वाहनांच्या खरेदीचे आकर्षण तरुणाईमध्ये कायम असून, वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाडय़ा खरेदीतून हा उत्साह ओसंडून वाहतो. मुहूर्ताच्या खरेदीने यास वेगळीच झिलई प्राप्त झाली होती. दुचाकी वाहनांची विक्री वाढली नसली, तरी मागील वर्षीइतकीच विक्री यंदा झाल्याचे हिरो होंडाचे वितरक राज ऑटोचे हेमंत खिंवसरा यांनी सांगितले. होंडा अॅक्टिव्हा, प्लेजर, मिस्ट्रो या प्रकारच्या ६००-७०० स्कूटरची, तर १३०० ते १४०० स्प्लेंडरसह अन्य बाइकची दसऱ्यानिमित्त विक्री झाल्याचे ते म्हणाले. मुहूर्ताची खरेदी यास ग्राहकांच्या दृष्टीने खास महत्त्व असते. त्यामुळे सण-उत्सवानिमित्त विशेष ऑफर वगैरे नसतानाही ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
चारचाकी गाडय़ांच्या खरेदीतील उत्साह काही वेगळाच असतो. स्कोडाच्या गाडय़ांची मुहूर्तावर खरेदी करून ग्राहकांनी सुवर्णयोग साधला. औरंगाबाद शहरातून १२, तर अहमदनगर येथून ४-५ ग्राहकांनी दसऱ्यानिमित्त स्कोडाची वाहने खरेदी केली. स्कोडा रॅपिड, स्कोडा अॅक्टिव्हा आणि स्कोडा सुपर्ब या वाहनांची ही खरेदी होती. सण-उत्सवानिमित्त मुहूर्ताची खरेदी ग्राहकांसाठी मोठी पर्वणीच असते, असे स्कोडाचे सरव्यवस्थापक अनिरबन सेनगुप्ता यांनी सांगितले. ऑटोमोटिव्ह शोरुममध्ये दिवसभरात १६५ गाडय़ांची विक्री झाल्याचे ब्रँच मॅनेजर विनय पंजियार यांनी सांगितले. मारुती डिझायर, ऑल्टो, व्ॉगन आर, सिआज या गाडय़ांची येथे विक्री झाली. दसऱ्यानिमित्त या गाडय़ांच्या विक्रीसाठी स्क्रॅच कार्ड कूपन योजना जाहीर केली होती. यात कोणत्याही कार्डवर हमखास बक्षिसाचे आकर्षण होते. सोन्या-चांदीच्या बाजारातही मुहूर्ताच्या खरेदीची धूम कायम होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातही मुहूर्ताच्या खरेदीचा उत्साह होता.