पक्ष बदनामी थांबविण्यासाठी आपण स्वत:च राजीनामा दिला असून चौकशीतून आपण निष्कलंक असल्याचे सिद्ध होईल, असे उत्तर राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तुळजापुरात दिले.

४० वर्षांच्या राजकीय आयुष्यातील हा दुर्दैवी प्रसंग आहे. केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे आपण फौजदारी गुन्हे दाखल करून आरोप करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यास आपले सहकार्य असून यातून लवकरच निष्कलंक सिद्ध होऊन बाहेर पडू, असे सांगून पक्ष बदनामी थांबविण्यासाठी आपण स्वत: राजीनामा दिला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

भाजपा नेते एकनाथ खडसे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, त्यांच्या पत्नी सविता फुंडकर, आमदार आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. पुजारी विकास मलबा यांनी त्यांची देवीपूजा केली. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. या प्रसंगी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड. अनिल काळे, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे आदी उपस्थित होते.

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या पदाचा उपयोग करू. शेतकऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करू असे सांगून आपण एकनाथ खडसेंचा पर्याय होऊ शकत नाही. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो, असे सांगितले. तसेच आम्ही दोघे एकमेकांचे नेते आहोत. कोणीही एकमेकांचा पर्याय नाही, असा खुलासा या वेळी मिश्कीलपणे माजी मंत्री खडसे यांनी केला. गुलचंद व्यवहारे यांनी या वेळी देवीची प्रतिमा, कवडय़ाची माळ घालून त्यांचा सत्कार केला.