करोना विषाणू प्रसाराची गती काहीशी स्थिरावल्याचे चित्र दिसल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असणारी वेरुळ आणि अजिंठा लेणीसह सर्व पर्यटन केंद्र गुरुवारपासून उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकरी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.  पर्यटनस्थळी वाटाडे (गाइड) म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची तत्पूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. तसेच पर्यटनस्थळाचे र्निजतुकीकरण करणे बंधकारक करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटक नसल्याने लेणीच्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती अक्षरश: कर्जबाजारी झाल्या होत्या. हॉटेल व्यावसायिक, पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे अर्थचक्रही थांबले होते. आता अर्थकारणालाही सुरुवात होणार आहे.  शुक्रवारी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. भारतीय पुरातत्त्व विभागाने देशातील अनेक पर्यटनस्थळे सुरू करण्याला या पूर्वी परवानगी दिली होती. विशेषत: आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी गर्दी सुरू झाल्यानंतर औरंगाबादची पर्यटनस्थळे का सुरू होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे पोलीस, पुरात्तत्व विभाग व आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत आज बैठक घेण्यात आली. बुधवारी लेणी परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून लेणी बंद असल्याने त्या भागात साप किंवा सरपटणारे प्राणी किंवा अन्य वन्यजीव आले आहेत का, याची पाहणी केली जाणार असून पर्यटनस्थळावर निगा राखणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

केवळ ऑनलाइन तिकीट

दररोज दोन सत्रात प्रत्येकी एक हजार पर्यटकांना ऑनलाइन तिकीट उपलब्ध होणार आहे. थेट तिकीट केंद्रावर तिकिटे मिळणार नाहीत. वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच बीबी का मकबरा, पाणचक्की तसेच औरंगाबाद लेणींचाही समावेश या निर्णयामध्ये  आहे. पर्यटनस्थळे बंद असल्याने येथील व्यावसायिकांचे हाल सुरू होते. अलीकडेच ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले होते.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ellora ajanta caves open for tourists from tomorrow abn
First published on: 09-12-2020 at 00:11 IST