इथेनॉल निर्मितीला गती मिळण्याची शक्यता

सुहास सरदेशमुख लोकसत्ता

औरंगाबाद : अतिवृष्टीनंतर राज्यातील ऊस गाळप हंगाम दणदणीत होण्याची शक्यता असून मागील दहा वर्षांतील सर्वाधिक १२३२ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली असून  हेक्टरी ९७ टन ऊस उत्पादकता असेल असा अंदाज आहे. राज्यात या वर्षी १९३ साखर कारखाने सुरू होतील आणि १०९६ लाख उसाचे गाळप होऊन ११२ लाख टन साखर निर्माण होईल असा अंदाज आहे. उत्पादित होणाऱ्या उसापैकी काही ऊस गूळ तयार करण्यासाठीही वापरला जाईल तसेच इथेनॉल निर्मितीचा वेगही अधिक असेल असे सांगण्यात येत आहे. या वर्षीचा ऊस गाळपाचा हंगाम विक्रमी असणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आता बॉयलर प्रदीपन करण्यास सुरुवात केली आहे.

खरे तर ३० टक्के ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वापरला जावा असे प्रयत्न असले तरी गेल्या वर्षीच्या आर्थिक ताळमेळ पत्रावर कर्ज देण्यास बँका फारशा तयार नव्हत्या. आता साखरेचे दर आणि इथेनॉल धोरण लक्षात घेता नव्या आसवानी प्रकल्पांना मंजुरी मिळत असल्याचे राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. या वर्षी सारी धरणे भरलेली आहेत. त्यामुळे ऊस हंगामच शेतकऱ्यांना तारेल असे चित्र आहे. बाकी सारी पिके जवळपास पाण्यात आहेत. त्यामुळे हाती लागले ते उसाचे पीक. त्यामुळे कारखान्यांनीही आता तयारीला सुरुवात केली असून ऊसतोड कामागारांशी करारही केले जात आहेत. उसतोडणी मजुरांनाही या वर्षी जरा अधिक भाव मिळेल असा अंदाज आहे. आधी आमच्या शेतातील ऊस कापा यासाठी शेतकरी मजुरांच्या मिनतवाऱ्याही करतील. त्यामुळे कापणीचा कार्यक्रम अधिक नीटपणे राबवावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान या वर्षी १० लाख टन ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जावा यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. या वर्षी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढण्याची संख्या आहे. पूर्वी साखर हंगाम जेवढे दिवस तेवढे दिवसच इथेनॉल निर्मिती होत असे. म्हणजे जास्तीतजास्त १७५ दिवस.

पण आता नव्या तंत्रज्ञानामुळे बी हेवी मळीपासून तसेच उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मती होत असल्याने ही प्रक्रिया वर्षांतील ३०० दिवस सुरू राहू शकणार आहे.  या वर्षीच्या विक्रमी लागवडीमुळे आणि पाणी उपलब्धतेमुळे साखर हंगामाची गोडी वाढण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भावही तेजीत असल्याने गाळप हंगामासाठी साखर कारखाने जोमात तयारी करू लागले आहेत.

आकडेवारी..

 ऊस लागवड – १२.३२ लाख हेक्टर

 प्रतिहेक्टर ऊस उत्पादकाता – ९७ टन

 सरासरी साखर उताऱ्याचा अंदाज – ११.१६

  राज्यात सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या – १९३

 गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस – १०९६ लाख टन

 अंदाजित साखर निर्मिती – ११२ लाख टन

दरवर्षीपेक्षा या वर्षी ऊस लागवड अधिक आहे. पूर्वी एक हजार लाख  हेक्टपर्यंत राज्यात लागवड होती. यामध्ये या वर्षी २०० लाख हेक्टरची वाढ झाली आहे. या वर्षी विक्रमी ऊस गाळप होईल. साखरेबरोबरच त्याचे उपपदार्थाची मागणी अधिक असल्याने आणि धोरणेही इथेनॉल निर्मितीला पूरक असल्याने हंगाम दणदणीत होईल. आता साखरेबरोबरच इथेनॉल निर्मितीलाही चालना मिळणार आहे.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर महासंघ