शुक्रवारी एकाच दिवशी जिल्हय़ाच्या दहाही तालुक्यांत राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी दौरा करून शेतकऱ्यांशी हितगुज केले. विविध ठिकाणी मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या शेतक ऱ्यांना आपले गाऱ्हाणे मांडताना ‘घाबरू नका, दुष्काळाशी समर्थपणे सामना करा, सर्व शक्तीनिशी सरकार आपल्या पाठीशी आहे’ अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी निलंगा तालुक्यात भेट देऊन पाहणी केली व तालुक्याची आढावा बठक घेतली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यात हिप्पळगाव, शिरपूर आदी गावांतील जलयुक्त शिवारची कामे पाहिली, पिण्याचे पाणी, चारा व उजाड शेतीच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर आढावा बठकीत अधिकाऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले. महाजन यांच्यासमोर ठिकठिकाणच्या भेटीत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.
मंत्री रामदास कदम यांनी औसा तालुक्यात अनेक गावांना भेटी दिल्या. उजनी येथील संजय जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला. मुलगा व मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अॅड. बळवंत जाधव, दिनकर माने आदी या वेळी उपस्थित होते. औसा तालुक्यास दर महिन्याला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास आपण येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
महिला व ग्रामविकासमंत्री विद्या ठाकूर यांनी रेणापूर तालुक्यात ईटी, भोकरंबा आदी गावांना भेटी दिल्या. रेणापूर येथील रेणा नदीच्या खोलीकरणाचे कामही त्यांनी पाहिले. त्यांच्यासमवेत कार्यकत्रे मोठय़ा संख्येने होते. आमदार त्र्यंबक भिसे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकत्रे उपस्थित होते. शेतकरी ठिकठिकाणी आपले गाऱ्हाणे मांडत होते. ठाकूर यांना मराठी भाषा येत नसल्यामुळे ते हिंदीत लोकांशी संवाद साधत होते.
राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जळकोट तालुक्यात जलयुक्त शिवारची पाहणी केली. मात्र, ठिकठिकाणी त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. जळकोट शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. मागील आठवडय़ात शिवतारे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा रोष होता, या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. शिवतारे यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या तर शिवसनिकांनी आक्रमक होत ‘कळपातून आला रे आला, शिवसेनेचा ढाण्या वाघ आला’ अशा घोषणा दिल्या. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सेनेचे जिल्हाप्रमुख नागेश माने, उपप्रमुख नामदेव चाळक उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री राम िशदे यांनी उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाची पाहणी केली. सोमनाथपूर येथे चालू असलेल्या गोरक्षण प्रकल्पास भेट दिली. तेथे चारा छावणी सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजय देशमुख यांनी अहमदपूर येथे जलयुक्त शिवारची पाहणी केली. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी लातूर शहर व तालुक्यात दौरा केला. शहरातील पटेल चौक भागात जाऊन नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली. हरंगुळ येथे जलयुक्त शिवाराच्या कामाचीही पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर बठकीत आढावा घेतला.
मार्गावर घागरींच्या रांगा
सुमारे पाच लाख लोकवस्तीच्या लातूर शहरातील सर्वच भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी येत नाही, किमान आपले गाऱ्हाणे तरी कोणी ऐकावे, असे नागरिकांचे म्हणणे होते. आदिवासीमंत्री सावरा यांनी शहरातील पटेल चौकात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. मात्र, ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे नागरिकांत नाराजी होती. विमानतळावरून मुख्यमंत्री निलंग्याला गेले, त्या मार्गावर अनेक ठिकाणी घागरींच्या लांबच लांब रांगा पाण्यासाठी लागल्या होत्या. भर उन्हात लोक पाण्यासाठी तिष्ठत होते. मात्र, गाडीतून उतरून लोकांशी बोलण्यासाठी मुख्यमंत्री वा महसूलमंत्र्यांनी वेळ काढला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famine able cope government
First published on: 05-03-2016 at 03:24 IST