छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद-छत्रपतीसंभाजीनगर रस्त्यावरील नंद्राबाद गावाजवळ रविवारी एका चारचाकी वाहनाने दोन पादचाऱ्यांना उडवले. दोघांनाही तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक विभागात सुभेदारपदी कार्यरत असलेल्या मनोजकुमार काटकर यांच्या क्रेटा या चारचाकीने पादचाऱ्यांना धडक दिली. यात अशोक यादु घुसळे (वय ५५, रा.नंद्राबाद) व ज्ञानेश्वर राधाकिसन जाधव (रा. ममनापुर ह. मु. नंद्राबाद ता. खुलताबाद), यांचा मृत्यू झाला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक विभागात सुभेदारपदी कार्यरत असलेले मनोजकुमार मारोती काटकर हे पत्नीसह कार (क्रमांक बी.एच.२४, डी ५३६३) यातून खुलताबादला पर्यटनाला गेले होते. छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रोडवरील नंद्राबाद गावाजवळील तलत अध्यापक महाविद्यालयासमोर त्यांच्या भरधाव चारचाकीने अशोक घुसळे व ज्ञानेश्वर जाधव यांना उडवले. शिवाय कार आणखी वेगाने चालवित म्हैसमाळच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर या ठिकाणी मारहाण होईल या भीतीने सुभेदार काटकर सरळ खुलताबाद पोलीस ठाण्यात हजर झाले.
या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सिध्दार्थ सदावर्ते करीत आहे. दरम्यान, अपघातात ठार झालेले अशोक घुसळे व ज्ञानेश्वर जाधव यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.