औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी सकाळी करोना विषाणूने संक्रमित असलेल्या चौघांचा मृत्यू झाला. या चौघांमध्ये तीन पुरुष असून एका २९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

औरंगाबादमधील गारखेडा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्ती, माहेतपूर येथील ४० वर्षीय तर पैठणमधील यशवंतनगरच्या ५० वर्षीय व्यक्तीचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. तर गंगापूर तालुक्यातील जिकठाण येथील २९ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. या महिलेला इतर कुठलाही आजार नव्हता, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

घाटीमध्ये मागील २४ तासात एकूण ५९ जणांच्या स्रावाचे नमुने घेण्यात आले. त्यातील २५ जणांचा अहवाल करोनाच्या लक्षणांचा आढळून आला. तर १७ जणांचा अहवाल नकारात्मक आला असून उर्वरित १७ जणांचा अहवाल येणे बाकी होते.

दरम्यान, जिल्ह्य़ात शनिवारी सकाळी घेण्यात आलेल्या अहवालानुसार १४६ करोनाबाधित रग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील ६७ तर ग्रामीण भागातील ७९ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा एकूण आकडा २० हजारांच्या पार गेला आहे. शनिवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार १९० झाली आहे.

त्यातील १५ हजार १५२ रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सध्या ४ हजार ४१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.