आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची शेतकऱ्याची भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर घसरल्याने कांदा, टोमॅटोच्या उत्पादकांपुढे नवे संकट उभे असतानाच त्या अडचणींचा सामना करणाऱ्यांच्या रांगेत आता आल्याचे पीक घेणारे शेतकरीही आले आहेत. काही दिवसांपासून आल्याचा क्विंटलचा दर ५००-६०० रुपये किमान, तर १४०० ते १४५० रुपये कमाल असा घसरला आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये अडीच हजार ते तीन हजार रुपये दर होते, तर यंदा मागील महिन्यात किमान एक हजार ते बाराशे रुपये क्विंटलपर्यंत होता. हे गडगडलेले दर पाहून फुलंब्री तालुक्यातील आले उत्पादक विवेक चव्हाण आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी उत्पादित मालाला भाव मिळत नसल्याने त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय कुठला पर्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करतात.

औरंगाबाद जिल्हय़ात वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांत कमीअधिक प्रमाणात आल्याची शेती केली जाते. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी विवेक चव्हाण यांच्या घरात आजोबांपासून आल्याचे उत्पादन घेतले जाते. चव्हाण यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा सल्ला देणाऱ्यांनाच प्रश्न विचारला, की यामध्ये नेमका फायदा कसा होईल, ५० हजार गुंतवून २० हजार हाती पडत असतील तर याला नफ्याचा व्यवसाय म्हणायचे की तोटय़ाचा? आल्याचीही शेती तोटय़ाचीच झाली आहे. एकरी १ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही हाती केवळ काही हजार येत असतील तर उत्पादकांनी कशाच्या आधारे जगावे आणि का शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येणार नाहीत, असा थेट सवाल करतात.

अनेक वर्षे आल्याचे उत्पादन घेत असल्यामुळे त्या पिकाबाबत बोलताना विवेक चव्हाण सांगतात, की जेव्हा जेव्हा लसणाचे दर वाढतात, तेव्हा तेव्हा आल्याचे भाव कोसळतात. २००९, २००३ आणि आता २०१६ सालचा अनुभव आहे. आज लसणाचा क्विंटलचा दर ९ ते १५ हजापर्यंत आहे. आखाती देशात मुबलक लसूण असतो तेव्हा आल्याचे दर कोसळतात.

आल्याचे व्यापारी गणेश आगळे सांगतात, की संपूर्ण भारतातच आल्याचे भाव गडगडलेले आहेत. टोळ आल्याचा दर ६०० रुपये क्विंटल, तर पंजाचा दर १४०० ते १५०० पर्यंत आहे. दररोज औरंगाबाद परिसरातून २५ ते ३० ट्रक माल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यात जातो. गतवर्षी अडीच ते ३ हजापर्यंतचा भाव होता.

औरंगाबाद बाजार समितीत दर गुरुवारी व रविवारी आल्याच्या मालाचा लिलाव होतो. रविवार, २५ डिसेंबर रोजी औरंगाबादेतील जाधववाडी बाजार समितीत १०८ क्विंटल आल्याची आवक झाली होती. त्याला किमान ६०० रुपये तर १४०० रुपये कमाल दर क्विंटलमागे मिळाला. आठवडाभरापूर्वीच्या गुरुवारच्या बाजारात किमान दर आणखी घसरलेला होता. गुरुवारी किमान ५०० रुपयेच दर मिळाला. कमाल १४५० रुपये होता. गुरुवारच्या बाजारात १३७ क्विंटलची आवक झाली होती. त्याला भाव चांगला मिळाला नसल्याने रविवारच्या बाजारात आवकही घसरलेलीच होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ginger production issue
First published on: 29-12-2016 at 01:10 IST