लातूर शहराला रेल्वेने पाणी उपलब्ध करून देण्यात आपलाच मोठा हात आहे, असा दावा करण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या शहरभर झळकणाऱ्या होìडगबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री खडसे यांनी प्रसंगी लातूरला रेल्वेने पाणी दिले जाईल, असे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते. त्यानंतर खडसे यांनी रेल्वेने पाणी देण्याचे श्रेय आपल्याच पदरात कसे पडेल, याकडे बारकाईने लक्ष दिले. लोकांचे लक्ष वेधले जाईल, अशा लातूरवाऱ्या केल्या व रेल्वेने पाणी लातूरला पोहोचताच शहरातील विविध भागांत अनेक होìडग झळकण्यास सुरुवात झाली. होìडगच्या खाली विविध सामाजिक संघटनांची नावे झळकत आहेत. काही ठिकाणी कोणतेच नाव नाही. ते होìडग नक्की कोणी लावले, हेही कळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होìडगमुक्त लातूर ही संकल्पना महापालिकेने प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली होती. खडसेंच्या होìडगबाजीने या संकल्पनेला चांगलाच छेद देण्यात आला आहे. होìडगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लहान आकारात, तर खडसेंचा फोटो मोठय़ा आकारात प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपण कोणालाही घाबरत नाही. आवश्यक त्या बाबींवर खर्च झाला तर कोणी त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली, याकडे आपण लक्ष देत नसल्याचे खडसेंनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याची प्रचिती आणणारी कृती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hoarding of eknath khadse for credit of water
First published on: 21-04-2016 at 01:40 IST