छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदांकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारावर मराठा आंदोलनाचे सावट आणि ५ सप्टेंबर रोजीच ईद-ए-मिलादची शासकीय सुटी, तर ६, ७ तारखेला गणपती विसर्जन आणि रविवार, अशा सलग तीन दिवस सुटी आल्याने वितरण सोहळा पुन्हा लांबण्याची चिन्हे आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे गतवर्षीचेही आदर्श शिक्षक पुरस्कार रखडले आहेत. गतवर्षीसह यंदाचेही पुरस्कार या वर्षी द्यावे लागणार असून, तशी भूमिका शिक्षक संघटनांकडूनही घेण्यात आली आहे. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून शिक्षकांऐवजी सुंदर शाळांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तत्कालीन एका अधिकाऱ्यास काही मंडळींनी शिक्षकांबाबत चुकीची माहिती दिल्याने त्यांनी ‘सुंदर शाळां’ना पुरस्कार देण्याच्या सूचना केल्याचे काही शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील प्राथमिक व माध्यमिक विभागातून प्रत्येकी नऊ आदर्श शिक्षकांची निवड करून दर वर्षी सोहळ्याच्या माध्यमातून सन्मान केला जातो. गतवर्षी पुरस्कार रखडले, तर यंदाच्या पुरस्कारांवर सुटी व मराठा आंदोलनाचे सावट असल्याने सोहळा पुढे ढकलण्याची चिन्हे दिसत आहेत.

गतवर्षीचे रखडलेले पुरस्कार विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यांनी गतवर्षीचे व यंदाचे मिळून एकत्रच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतील, असे शिक्षक संघटनांना आश्वस्त केले आहे. यापूर्वीही एका वर्षी पुरस्कार वितरणाचा सोहळा झालेला नव्हता. त्यानंतरच्या वर्षी सलग दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण झाले होते. – राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, म. रा. प्रा. शिक्षक संघ आदर्श शिक्षकांच्या नावांची यादी शिक्षण विभागाने तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण सोहळा होणार आहे. यंदा ५ सप्टेंबर रोजी शासकीय सुटी आल्याने तारीखही निश्चित केली जाईल.- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी