सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : मन आणि शरीर याचा संबंध म्हणजे योग. योग दिन आता राजशिष्टाचार बनू लागला असला तरी वेरुळ, अजिंठा लेणींमधील संदेश हे योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच होते. मात्र लेणींच्या सौंदर्य प्रशंसेमध्ये योगाचे महत्त्व सांगणारा संदेश मात्र धूसर होत गेला.

बौद्ध, जैन व हिंदू लेणींमधील बहुतांश मूर्ती या ध्यानस्थ असून बहुतांश शिल्प हे योगमुद्रा स्थितीतील आहेत. पण त्याचा अभ्यास मात्र अद्यापि पुराविद्य तज्ज्ञांकडून झालेला नाही. पण या विषयावर महात्मा गांधी मिशनच्या ‘महागामी’ गुरुकुल पद्धतीने नृत्यशिक्षण देणाऱ्या पार्वती दत्ता यांनी ‘लेणी – नृत्य आणि योगा’ या विषयावर आता काम करणे सुरू केले असून त्यावर त्यांचे पुस्तक लिखाणही सुरू आहे.

वेरुळ किंवा अजिंठा लेणींमधील बहुतांश मूर्ती ध्यानस्थ आहेत. त्या साऱ्या योगमुद्रा आहेत आणि त्याचा भोवताल हा नृत्यशिल्पांचा आहे. शिवशंकर हा महायोगी. तोच नटराज हे एकरूप असण्याचे अर्थ समजून घेत नसल्याने लेणी हा योग याचा संबंध लावण्याचे आपण विसरतो. बौद्ध मूर्ती तर ध्यानस्थच आहेत. अजिंठय़ातील ध्यानस्थ अवस्थेतील हे शिल्प तर प्रकाशकिरणांच्या आधारे हास्यमुद्रेतही दिसू शकते.

शिल्पांचा हा अनोखा संबंध योगक्रियेशी व योगासनाशी असतो. शरीर आणि मन या दोन्हींचा मिलाफ म्हणून वेरुळ व अजिंठय़ांच्या लेणींकडे पहायला हवे.

वेरुळ व अजिंठा लेणींच्या अतिभव्यतेने भारावलेपण आले तरी याचा कला, संस्कृती या अंगांने अजून अभ्यास व्हायला हवा, असे पार्वती दत्ता सांगतात.  अजिंठा व वेरुळ लेणीचे अभ्यासक प्रभाकर देव म्हणाले, ‘‘मन नावाची गोष्ट असते असे मान्य करून योगासने व योगमुद्राही लेणीमध्ये आहेच.

त्यावरून योग हा १२०० वर्षांपूर्वी नित्य जगण्याचा भाग असावा. अष्टांग योग सांगणारे पतंजली यांनी केलेला अभ्यासही शिल्पामधून दिसतो.

कारण योगाभ्यास हा त्या काळी नित्याचा भाग असावा असे दिसते.’’  लेणींमध्ये योगमुद्रांपेक्षा योगासने अधिक आहेत. त्याचा काही संबंध नाथ संप्रदायाशी लागत असल्याचे अभ्यासक सायदी पलांदे- दातार सांगतात. लेणीमधील शिल्प व योग याचा स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.

७५ वारसा ठिकाणावर योग

भारतीय पुरातन वारसा सांगणाऱ्या ७५ स्थळी योग दिन साजरा होणार आहे. औरंगाबाद येथे वेरुळ येथे केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी तसेच भारतीय सैन्य दलातील जवान वेरुळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग करणार आहेत. आता केवळ एकच नाही तर औरंगाबाद शहरातील ७५ वॉर्डातही भाजपच्या मदतीने योग दिन साजरा केला जाणार आहे.

* शरीर आणि मन या दोन्हींचा योग म्हणजे नृत्य. जिथे दोन्ही अवयव एकाच वेळी काम करत असतात. किंबहुना तादात्म्य पावलेला असतो. योग. वेरुळ किंवा अजिंठा लेणींमधील बहुतांश मूर्ती ध्यानस्थ आहेत. त्या साऱ्या योगमुद्रा आहेत आणि त्याचा भोवताल हा नृत्यशिल्पांचा आहे.

* शिवशंकर हा महायोगी. तोच नटराज हे एकरूप असण्याचे अर्थ समजून घेत नसल्याने लेणी हा योग याचा संबंध लावण्याचे आपण विसरतो. बौद्ध मूर्ती तर ध्यानस्थच आहेत. अजिंठय़ातील ध्यानस्थ अवस्थेतील हे शिल्प तर प्रकाशकिरणांच्या आधारे हास्यमुद्रेतही दिसू शकते.