मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये सभा घेतली. गुढीपाडव्याच्या सभेनंतर त्यांनी ठाण्यात उत्तरसभा घेतली. त्यानंतर औरंगाबादेत आज सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या या भाषणानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सियासत की दुकानों मे रोशनी के लिए, जरुरी है मुल्क मेरा जलता रहें”, (आपल्या राजकारणासाठी लोकांमध्ये भांडण होत राहावी) हाच हेतू राज ठाकरेंच्या भाषणाचा होता, अशी टीका जलील यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी अल्टिमेटम मुस्लीम समाजाला नाही, तर राज्य सरकारला दिलंय. त्यामुळे हा संपूर्ण मुद्दा राज्य सरकार कसा हाताळते हे पाहणं महत्वाचं आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं आहे, त्यामुळे ते ही परिस्थिती कशी हाताळते, काय निर्णय घेतात हे पाहू. पण ३ मे ची तारीख एका दिवसांनी वाढवली आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ ते अयोध्येला निघून जातील आणि नंतर कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावावी, काही झाल्यास कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावेत, राज मात्र अयोध्येला जातील. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी त्यांना भरकटवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत,” अशी टीका इम्तियाझ जलील यांनी केली.  

भोंग्यावर बोलत असतानाच औरंगाबादमध्ये अजान सुरू, राज ठाकरे संतापून म्हणाले, “पोलिसांनी आत्ताच्या आत्ता…”

“तुम्ही भाजपाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहात, मग त्यांची देखील यापूर्वी पाच वर्ष राज्यात सत्ता होती. त्यांनी त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही. राज्यात सगळं सुरळीत चाललंय, करोनातून वाचलो आहोत, वर्षापूर्वी आपण औषधांसाठी भांडत होतो आणि आता आपण रोजगार, महागाई, आरोग्य सुविधा हे सर्व सोडून भोंग्यांवर बोलत आहात. इतिहास आता पुन्हा उकरून काढण्यात काही अर्थ नाही,” असं इम्तियाझ जलील म्हणाले.

“माझ्या सभेला गर्दी होते म्हणून मी निर्णय घेणार, असं नसतं. आणि जर असं असेल तर त्याच मैदानात दुपटीने लोक बोलवून मला सभा घेण्याची परवानगी द्या, त्याच्यापेक्षा मोठं मैदान असेल तर त्याची परवानगी द्या. हा देश संविधानावर चालतो, इथे हुकूमशाही चालत नाही. आम्ही एवढं बोललो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. जीभ मलाही आहे, मी ही बोलू शकतो, नियम सगळ्यांसाठी आहे. ज्या भाषेचा वापर तुम्ही करताय, त्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो,” असा इशारा इम्तियाझ जलील यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर दिला. मात्र, आपण तसं करणार नसून राज्यात सर्वांनाच राहायचं आहे, असंही इम्तियाझ जलील म्हणाले.