छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव शिवारात बुधवारी रात्री एका बिबट्याला गुरुवारी सकाळी वन विभागाचे व ‘मॅन विथ इंडिज फाउंडेशन’च्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.

गल्लेबोरगाव शिवारातील शेतकरी ईश्वर बारवाळ यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे सकाळी लक्षात आले. त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथके गल्लेबोरगाव शिवाराकडे रवाना करण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्यासह वनपाल संदीप मोरे, वनरक्षक मयूर चौधरी, सुनील कडपे, वनसेवक बबन सोनावणे, बबन म्हसरूप, नाना औटे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वन विभागाच्या समन्वयानंतर मॅन विथ इंडिज फाउंडेशनच्या वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकप्रमुख आशिष जोशी यांच्यासह शुभम साळवे, सूरज पानकडे आणि हर्ष केवारे यांनी अवघ्या काही मिनिटांत बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात घेतले. ‘बिबट्याला कोणतीही इजा न होता बाहेर काढणे हे आमच्यापुढे आव्हान होते,’ असे आशिष जोशी यांनी सांगितले. वन विभागाकडून बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही थरारक घटना पाहण्यासाठी परिसरातील काही नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होते.

विहिरीत पडलेला बिबट्या हा नर असून, त्याची पूर्ण वाढ झालेली आहे. पाचेक वर्षांचे त्याचे वय असून, मार्जार वर्गातील असा प्राणी तरुणच समजला जातो. बिबट्याला निशाचर प्राणीही म्हटले जाते, असे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.

वन्यजीव बचाव ही अतिशय संवेदनशील प्रक्रिया आहे. अशा वेळी वन विभाग आणि सामाजिक संस्थांमधील समन्वय महत्त्वाचा ठरतो. मॅन विथ इंडिज फाउंडेशनच्या बचाव पथकाच्या सहकार्याने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. या बचाव मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्येही आता भीतीचे वातावरण राहिले नाही. – निखिल देशमुख, वन परिक्षेत्र अधिकारी, खुलताबाद

विहिरीत पडलेल्या बिबट्याला पथकाने सुखरूप बाहेर काढले. त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. – सुवर्णा माने, उपवनसंरक्षक