छत्रपती संभाजीनगर : धाराशिव शहरातील रस्ते कामांसाठी ११७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला म्हणून शहरात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे अभिनंदनाचे फलक लागलेले असताना उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली.

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून या प्रकरणात दोनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. एकनाथ शिंदे यांनी तत्काळ धाराशिव नगरपरिषदेला कार्यारंभ आदेशास स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काम सुरू करू नये, असे पत्र नगर परिषदेतून देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी धाराशिव जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांच्या वादाचा तिसरा अंक सुरू झाल्याचे चित्र आहे.

धाराशिव शहरातील ११७ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीवरून मंगळवारी स्थगिती देण्यात आली. त्यावरून शहर आणि परिसरात चांगलेच रणकंदन सुरू झाले आहे. धाराशिव शहरातील रस्ते कमालीचे खराब झाले असून, दिलेल्या निधीस सुरुवातीला तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी स्थगिती दिल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला. त्याला ‘लायकी’ या शब्दाची चांगलीच फोडणी दिली गेली. शहरातील रस्त्यांच्या कामाच्या निविदांवरून सुरू असणाऱ्या या वादात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. ११७ कोटींच्या निविदा मंजूर करताना कार्यपद्धतीमध्ये अपारदर्शकता तर होतीच शिवाय कामास विलंब करण्यात आला.

रस्ते कामाच्या निविदा वैधता आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करत निवडक निविदा १५ टक्के अधिक दराने काढल्याचा आरोप होता. तसेच राजकीय हस्तक्षेप आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावर निविदाधारकाने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी फेरनिविदेच्या सूचना केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रस्ते कामांची फेरनिविदा न राबवता त्याच ठेकेदाराला पुन्हा कार्यारंभ आदेश देणे योग्य ठरणार नाही, अशी तक्रार प्रताप सरनाईक यांनी केली होती. दरम्यान, या अनुषंगाने भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी समाज माध्यमांमध्ये मजकूर लिहून राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये, आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देईन, असे म्हटले आहे.

पालकमंत्र्यांच्या स्थगितीमागे विरोधक असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी केला आहे. विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरूनच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी रस्ते कामांवर स्थगिती आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण दाद मागितली आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.