छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाकडून काढण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेत उत्पन्न वाढीसाठी मोक्याच्या जागांचे खासगीकरण करण्याचा निर्णय झाला असून, छत्रपती संभाजीनगरमध्येही अत्यंत महत्त्वाच्या, बाजारपेठेच्या आणि प्रमुख मार्गांलगतच्या ठिकाणी अब्जावधींच्या किमतीतील सुमारे दीडशे एकर जागा पडीक असल्याचे चित्र आहे. त्यातील बरीचशी जागा अतिक्रमित झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारने सुमारे ४० वर्षांपूर्वी खुलताबादजवळील कागजीपुरा भागात महामंडळात रुजू होणाऱ्या एसटीचालकांसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास दिलेली ११२ एकर जागा आहे. या जागेवर ४० वर्षांत काहीही उभे राहू शकले नाही. या जागेच्या संदर्भाने महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला आहे. मात्र, कागजीपुरा येथील हीच जागा दीडशे एकर असल्याचे काही निवृत्त अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे ३८ एकर जागा कोठे गेली, असाही एक प्रश्न निर्माण होत आहे.

शहरातील अत्यंत गजबजलेले ठिकाण म्हणून ओळख असलेल्या शहागंजमधील स्टेट टाॅकीजच्या परिसरात राज्य परिवहन महामंडळाचे पूर्वी क्षेत्रीय कार्यालय होते. ते सिडकोतील बस स्थानक परिसरात नेण्यात आले. सिडको एन-५ मध्येही कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची वसाहत असून, तेथे ४ ते ५ एकर जागा पडून आहे. या ठिकाणी केवळ तीन ते चार निवासस्थाने आहेत. या सर्व जागांचा आजच्या विकासकांकडून बाजारभाव काढला, तर १० ते १५ हजार रुपये चौरस फुटांपेक्षाही अधिकचा दर असून, त्या तुलनेत महामंडळाच्या जागांचा भाव काही अब्जावधींमध्ये गणला जातो आहे. वाळूज-पंढरपूरच्या दरम्यान बस स्थानकासाठी चार ते पाच एकर जागा महामंडळाला काही वर्षांपूर्वी मिळालेली होती. सध्याच्या सिडको बस स्थानकाचीही जागा सात ते आठ एकरच्या आसपास असून, बस स्थानक व एक कार्यालयाचा बांधकाम झालेला भाग सोडला, तर त्यातीलही काही जागा पडूनच आहे.

महामंडळाने रिकाम्या जागांच्या ठिकाणी नवीन प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिकाम्या जागांच्या निर्णयाबाबत विभाग नियंत्रकांशी काही बैठक झालेली नाही. सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

खुलताबादजवळील कागजीपुरा येथे महामंडळाची ११२ एकर जागा आहे. वाळूज-पंढरपूरची जागा एमआयडीसीने दिलेली होती, ती त्यांना परतही करण्यात आली आहे. सिडको बस स्थानक, सिडको-एन ५, शहागंज अशा ठिकाणी जागा आहेत. त्यावर आता ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ तत्त्वानुसार बांधकाम करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने देवगाव रंगारी, फुलंब्री येथे उभारणी होणार आहे. गणेश राजगिरे, कार्यकारी अभियंता, महामंडळ