औरंगाबाद: मराठवाडय़ातील इतिहासाला खूप वेगवेगळे पदर. लज्जागौरीच्या शिल्पापासून ते वेरुळ- अजिंठय़ापर्यंतचे शिल्प आणि अनेक मंदिरांवरील कोरीवकाम पर्यटकांना साद घालत राहते. पण इतिहासातील अनेक शिल्पे, वस्तूंची होणारी हेळसांड थांबविण्याच्या प्रयत्नांना आता वेग येताना दिसत आहे. शहागंजमधील घडय़ाळ, माणकेश्वर मंदिरावरील पत्रलेखिका स्त्री, वेरुळ- अजिंठय़ाच्या विकासाबरोबर आता बारव संवर्धन चळवळही बहरात आहे. १९०१ ते १९०६ या काळात शहराला वेळेचे भान देणारे घडय़ाळ शहागंजमध्ये उभारण्यात आले. युद्धकाळात या घडय़ाळाच्या आधारे धोक्याची घंटाही दिली जायची. पुढे कालौघात हे घडय़ाळ बंद पडले. अनेक वर्षे त्याची दुरुस्ती करण्याचेही प्रयत्न झाले. पण नव्याने स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहागंज मनोऱ्यावरील घडय़ाळ सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. गुरुवारी त्या घडय़ाळाची टिकटिक सुरू झाली. हैदराबाद येथील असे घडय़ाळ दुरुस्तीच्या कामात असणाऱ्या रमेश वॉच कंपनीकडून ते दुरुस्त केले आहे. तीन लाख सहा हजार रुपये खर्च करून जुने घडय़ाळ नव्याने सुरू करून इतिहास जपला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी आता त्याला तिरंगी झळाळीही मिळाली आहे. औरंगाबाद शहरात दोन ठिकाणी ऐतिहासिक घडय़ाळे आहेत. त्यातील एक घडय़ाळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. या घडय़ाळाच्या मनोऱ्याचे नूतनीकरण केल्यानंतर घडय़ाळ दुरुस्तीसाठी कारागीर मिळत नव्हते. हैदराबाद येथील रमेश वॉच ही कंपनी देशभरातील जुनी घडय़ाळे दुरुस्त करण्याच्या क्षेत्रातच काम करते. रेल्वे स्थानकावरची काही घडय़ाळे देखील याच कंपनीने केल्याचे कंपनीचे रमेश यांनी सांगितले. १९४८ पासून घडय़ाळ दुरुस्तीच्या कामात असणारे रमेश म्हणाले, औरंगाबादमधील हे घडय़ाळ आता जीपीएस प्रणालीशी जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा खूप अचूक वेळ ते दाखवेल.

ऐतिहासिक औरंगाबादमधील इतिहासाकडे कमालीचे दुर्लक्ष करणे ही जणू प्रशासकीय पातळीवर सवयच जडल्यासारखे वातावरण होते. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पातून काही नवे प्रकल्प हाती घेण्यात आले. शहागंजमधील या घडय़ाळाची टिकटिक आता सुरू झाली असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले. महापालिका आणि स्मार्ट सिटीतून घेण्यात आलेल्या या प्रयोगाचे इतिहासप्रेमी आता कौतुक करू लागले आहेत.

पत्रलेखिकेचे शिल्प

उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्वर येथील मंदिराच्या भिंतीवरील एक पत्रलेखिकेच्या शिल्पास गेली अनेक वर्षे शेंदूर फासला जात होता. तीन- चार इंचाचा थर त्यावर होता. या भागात सटवाईचे मंदिर होते. सटवाई मुलांचे भविष्य लिहिते या गोष्टीचा प्रभाव एवढा होता की, या भागातील भाविकांनी या शिल्पास शेंदूर फासला. चालुक्यकालीन अतिशय रेखीव मंदिरातील काही शिल्पे जपावी लागतात हे राज्य पुरातत्त्व विभगाचे उपसंचालक अमोल गोटे यांनी माणकेश्वर भागातील प्रमुखांना समजावून सांगितले. आणि एका शिल्पावरचा शेंदूर गळून पडला.

वेरुळ लेणीमध्ये बॅटरीवर चालणारे वाहन : वेरुळ लेणी पाहावयास येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅटरीवर चालणारे वाहन सुरू केले जाणार असून १५ ऑगस्टपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. पयर्टनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. देवगिरी किल्ल्यावर ध्वनी प्रकाश खेळही सुरू केला जाणार आहे. हे कामही लवकरच केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसात वेरुळच्या कैलास लेणीमध्ये उद्वाहकही बसविण्यात येणार आहे. देशात अशा प्रकारची ही पहिली सुविधा असणार आहे.

बारवांची मोहीम जोमात

मराठवाडय़ात बारव स्वच्छतेची मोहीमही जोमात आहे. गेल्या काही महिन्यांत स्थानिकांच्या मदतीने बुजलेल्या बारवा दुरुस्त करण्याची चळवळच तरुणांनी हाती घेतली आहे. केवळ तरुणच नाही तर देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीनेही या मोहिमेला गती देण्यात आली. या मोहिमेची माहिती देताना किशोर शितोळे म्हणाले, जसा दुष्काळ सुरू झाला तसे जलदूत म्हणून आम्ही काम करतो आहोत. आतापर्यंत बारव स्वच्छ केल्या. आता त्या- त्या भागात बारवातील पाण्यावर नवे प्रयोग हाती घेतले जात आहेत. मराठवाडय़ातील बारव स्वच्छतेच्या प्रयोगात गावागावातील तरुण सहभागी होत आहेत.