दुष्काळाशी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता जाणवू नये, या उद्देशाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने ‘जलमित्र’ हा उपक्रम बुधवारपासून सुरू करण्यात आला. दूधना आणि गिरणा नद्यांच्या भोवतालच्या १२ गावांतील कार्यकर्त्यांना यात प्रशिक्षण दिले जात आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने या संस्थेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून मिळालेल्या २४ लाख रुपयांच्या रकमेतून कार्यकर्ते घडविण्याचे काम या संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
मराठवाडय़ात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न होतात. मात्र, गावातून सहभाग वाढावा, शेतकऱ्यांना पाणी बचतीचे महत्त्व समजावे यांसह विविध पातळ्यांवर काम करता यावे, म्हणून जलमित्र उपयोगी ठरतील, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. १६ ते २० मार्च दरम्यान जलमित्र कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हाती घेण्यात आले. त्याचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. एमआयटीचे यज्ञवीर कवडे, किशोर शितोळे, डॉ. संदीप डफळे, सुहास आजगावकर, माधुरी आफळे, डॉ. प्रतिभा फाटक व डॉ. प्रसन्ना पाटील यांची या वेळी उपस्थिती होती. आडगाव, अंजनडोह, नायगव्हाण, धुंडखेडा, कणकोरा, लिंगदरी, चारठा, खामखेडा, गेवराई, पिंपळगाव, गोळेगाव, भोयगाव व बाभुळगाव या गावांतील कार्यकर्ते या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. विविध तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalmitra initiative start for drought fighter
First published on: 17-03-2016 at 01:42 IST