छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद संस्थानातील सामंतशाही, प्रशासकीय पातळीवरचा अनागोंदी कारभार, इंग्रज सरकारच्या अमलात असलेल्या प्रदेशापेक्षा उशिराने सुरू झालेली सामाजिक सुधारणांची चळवळ, संसाधनांची असमानता अशा कालखंडात जगणाऱ्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांनी उभारलेल्या लढ्यामुळे आधुनिक लोकशाही व्यवस्थेत आणता आले. त्या काळात विधायक संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देण्यात आले होते. ते अर्धवट राहिलेले सूत्र आता पूर्ण करावे लागेल, असे मत सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले.

‘संन्याशाच्या डायरीतून-हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. सुरेश खुरसाळे होते. या वेळी व्यासपीठावर पत्रकार निशिकांत भालेराव, सारंग टाकळकर, ‘साधना’ चे संपादक विनोद शिरसाठ यांची उपस्थिती होती.

‘निजामाने उभ्या केलेल्या रझाकाराच्या विरोधात उभा राहिलेल्या लढ्याला तेव्हा पैसा कमी पडत होता. म्हणून स्वामी रामानंद तीर्थ महात्मा गांधींकडे गेले. त्यांनी चळवळीसाठी पैसा मागितला. गांधींनीही कोरा धनादेश दिला. पण तो देताना ते म्हणाले, चळवळीसाठी माणसं आणि पैसा आपणच उभा करायचा असतो. स्वामी रामानंद तीर्थ यांनी तो धनादेश घेतला नाही आणि माणसं आणि पैसा दोन्ही स्वत: उभा केला. त्यामुळेच जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वसामान्य माणसांच्या तोंडी तीन नावे होती, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ. महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच विचाराने हैदराबाद मुक्तीचा लढा सामंतशाही विरोधाचा होता. अनागोंदी दूर करण्यासाठी होता.’ असे दिवेगावकर म्हणाले.

निजामकालीन हैदराबाद संस्थानांतील अनागाेंदीची त्यांनी काही उदाहरणे दिली. निजाम हे केवळ एक संस्थान होते असे नाही तर १४ उपसंस्थाने होती. निजामापेक्षाही या जहागीरदारांनी लोकांना शेतात नुसतेच राबवून घेतले होते. राबणारा वेगळा आणि मालकी वेगळी अशा व्यवस्थेत एवढी अनागाेंदी होती की, परळीच्या व्यक्तीला एखादे सरकारी काम पडले तर त्याचा जिल्हा तेलंगणामध्ये होता. अगदी एका उपसंस्थानाचे नावही अनागाेंदी असेच होते. अशा कालखंडात स्वातंत्र्याचा लढा स्वामींची उभारला. त्यांची प्रतिमा खरे तर मुत्सद्दी प्रशासकीय नेता अशी आपण चितारत नाही, याचे आश्चर्य वाटते, असेही दिवेगावकर म्हणाले. या वेळी पत्रकार निशिकांत भालेराव यांनी या लढ्यात धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक दोन्ही बाजूची गुंतागुंत उलगडून दाखवली. या लढ्यात निजामाच्या विरोधात लिहिणाऱ्या शोएब उल्ला खान नावाच्या पत्रकाराने निजामाच्या विरोधात ‘इमरोझ’ नावाच्या दैनिकात केलेल्या टीकेचे दाखले दिले. नंतर त्याचा खून झाला. या लढ्यात मुस्लिमही होते. कमी संख्येने होत पण होते, असे सांगत या लढ्याचे रूप कधी धार्मिक होणार नाही याची काळजी स्वामी रामानंदतीर्थ कशी घेत हे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी केले. विनोद शिरसाट यांनी पुस्तक प्रकाशनाबाबतची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी बोरीकर यांनी केले.