उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक मे महिन्यात अपेक्षित असून, गेल्या तीन निवडणुकांमध्ये म्हणजे तब्बल १८ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार दिलीप देशमुख करत आहेत. बदललेल्या राजकीय गणितात नगरपालिका आणि जिल्हा परिषदांवर भाजपचा पगडा असल्याने ही निवडणूक काँग्रेसला जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मतदारसंघासाठी पक्षाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले, अजून या निवडणुकीला वेळ आहे. मात्र या अनुषंगाने पक्षांतर्गत चित्र स्पष्ट झालेले नाही. दिलीपराव देशमुख निवडणुकीला इच्छुक आहेत की नाही, हेदेखील अजून समजू शकलेले नाही. त्यांना या अनुषंगाने विचारले असता, ‘निवडणुकीला अद्याप वेळ आहे,’ एवढेच ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना पक्षाकडे दिलीपराव देशमुख यांना स्वतंत्रपणे उमेदवारी मागण्याची आवश्यकता भासली नव्हती. उमेदवारीची प्रक्रिया पक्षांतर्गत सोपस्कार म्हणून पार पाडली जायची. लातूर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती व नगरपालिकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर सत्तेची गणितेही पूर्णत: बदललेली आहेत. लातूर जिल्हा परिषदेवर आणि महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात भाजपचे कमळ चिन्ह कधीही मतदारांना दिसत नव्हते. तरीदेखील नगरपालिकेच्या निवडणुकीत काही मोजक्या जागा त्यांना मिळाल्या. बीड जिल्ह्य़ात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संख्यात्मक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी तडजोडीच्या राजकारणात सत्ता मिळविण्यात भाजपला यश आलेले आहे. अगदी बीड जिल्हा परिषदेत भाजपचे २० सदस्य आहेत. शिवसंग्राम आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार सदस्य आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी भाजपला समर्थन दिलेले असल्यामुळे सत्ता भाजपची आहे.

परळी, माजलगाव, गेवराई येथेही राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजपला धारूर, वडवणी आणि आष्टी-पाटोदा नगरपंचायतींमधून वर्चस्व मिळालेले आहे. हे वर्चस्व सुरेश धस यांच्या भाजपच्या जवळिकीमुळे अधिक बळ आले आहे. धस यांचा अजूनही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. मात्र ते या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. एका बाजूला काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता आहे आणि दुसरीकडे भाजपमधून या मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी खास प्रयत्न सुरू आहेत.

२५ मे २०१२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्वीच्या निवडणुकीत भाजपकडून सुधीर दुत्तेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता बदललेल्या राजकीय गणितांमुळे काँग्रेसकडून ना उमेदवाराची चाचपणी सुरू आहे, ना निवडणूक लढविण्याची तयारी. सारे काही शांत असेच काँग्रेसमधले वातावरण आहे.

मराठवाडय़ात नांदेड वगळता अन्यत्र काँग्रेची पीछेहाटच झाली. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने बीडच्या रजनी पाटील यांना फेरसंधी दिली नाही. अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोन्ही मराठवाडय़ातील खासदार असल्याने राज्यसभा पुन्हा मराठवाडय़ात नको, असा विचार झाला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठवाडय़ातून चांगले यश मिळावे, असा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा प्रयत्न आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local body elections in aurangabad
First published on: 23-03-2018 at 02:30 IST