छत्रपती संभाजीनगर : पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा दगडावर डोके आपटून खून केला व नंतर तिचा मृतदेह दौलताबाद घाटात फेकला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. आरोपीने शुक्रवारी सकाळी शिऊर पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. मृत तरुणी कन्नड येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती. गेल्या काही महिन्यांपासून तिचे मांडकी (ता. वैजापूर ) येथील सुनील सुरेश खंडागळे (वय २१) या तरुणाशी प्रेमसंबंध होते.

सुनील गुरुवारी वडिलांची दुचाकी घेऊन कन्नडला जाऊन तरुणीला भेटला. त्यानंतर ते दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. रात्री दौलताबाद घाटात त्यांच्यात तीव्र वाद झाला. वादाचे कारणही गंभीर होते. तीने सुनीलकडे एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास ‘बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन’ अशी धमकी दिल्याचे सुनीलने पोलिसांना सांगितले. या धमकीने संतप्त झालेल्या सुनीलने रागाच्या भरात तीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला आणि तिचा मृतदेह घाटात ढकलून दिला. ही घटना घडल्यानंतर काही तासांतच सुनील शुद्धीवर आला आणि थेट शिऊर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच तो आढळून आला. नंतर ओळख पटवून मृतदेह त्या तरुणीचाच असल्याची खात्री करण्यात आली. सुनीलवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी सुनील खंडागळे हा शिऊर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तो ठाण्याच्या हद्दीतील मांडकी गावचा रहिवासी आहे. त्याने घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृत तरुणीचा मृतदेह शोधण्यात आला. आरोपी सुनील यास दौलताबाद पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले. घटनेप्रमाणे गुन्हा तेथेच दाखल झाला. – वैभव रणखांब, पोलीस निरीक्षक, शिऊर.