राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार

केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील विस्तारामध्ये आपला नंबर लागावा, म्हणून भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विस्तारात सेनेच्या वाटय़ाला किती जागा येतात आणि यामध्ये मराठवाडय़ातील नेत्यांना स्थान मिळते की नाही, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सेनेतून अर्जुन खोतकर, संजय शिरसाट आणि ज्ञानराज चौगुले यांची नावे चर्चेत आणली जात आहेत. परभणीचे राहुल पाटील यांना युवा सेनाध्यक्षांच्या जवळचे असल्याने संधी मिळू शकते, असा दावा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. भाजपमधून संभाजी पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव यांची नावे चर्चेत आहेत. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनीही माळी समाजाची परिषद घेऊन मंत्रिपदाच्या स्पध्रेत उडी घेतली आहे.

मराठवाडय़ात भाजपचे १५, तर सेनेचे ११ आमदार आहेत. उस्मानाबाद, लातूर व बीड या तीन जिल्हय़ांत शिवसेनेचा एक आमदार आहे. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा निवडून आलेले. या भागात शिवसेना वाढवायची असेल तसेच सर्व जाती समूहाला सामावून घ्यावयाचे आहे, असा संदेश द्यायचा असेल तर चौगुले यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी केली जात आहे. तसेच शिवजलक्रांती योजना जालना जिल्हय़ात यशस्वीपणे राबविणारे अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले अर्जुन खोतकर यांच्यासाठीही जोर लावला जात आहे. युवा सेनाध्यक्षांच्या जवळचे अशी ओळख असणाऱ्या परभणीचे राहुल पाटील यांच्या समर्थकांनाही त्यांचा नंबर विस्तारात लागू शकतो असे वाटते.

मराठवाडय़ातून शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे वाटय़ाला येणाऱ्या मंत्रिपदात या भागातील आमदारांचा विचार केला जावा, असा जोर लावला जात आहे. शिवसेनेतील संघटनात्मक पदे मुंबईतील व्यक्तींनाच मिळतात. निवडून येऊनही पक्षात फारशी किंमत मिळत नाही.

मंत्रिपदाच्या वाटय़ात मुंबईकर शिवसेनेच्या नेत्यांची संख्या अधिक असते. ११ आमदार निवडून आल्यानंतरही या भागातील एकाही आमदाराला शिवसेनेने स्थान दिले नव्हते. त्यामुळे विस्तारात शिवसेनेच्या हिश्श्यातील मंत्रिपद मराठवाडय़ाला मिळायला हवे, अशी मागणी केली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात आपलाही क्रमांक लागावा, यासाठी भाजप नेत्यांनीही प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. मात्र, त्यांना भाजपमधील एका गटाचा विरोध आहे. आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदासाठी ओबीसी कार्ड पुढे केले आहे. माळी समाजातील एकाला तरी मंत्रिपद द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर हे दोन कॅबिनेट मंत्री मराठवाडय़ाचे आहेत. त्यामुळे आता विस्तारात कोणाचा नंबर लागतो याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. महामंडळावर तरी निवड व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही मंडळींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठांनी आपली शिफारस करावी, असे प्रयत्न केले होते. त्यामुळे या विस्तारात कोणाचे नाव येते याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.