नात्यागोत्यांसह माहेरपणालाही पारख्या झालोत : महिलांच्या भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रांधा-वाढा, उष्टी काढा, या धबडग्यातून वेगळेपण मिळावे आणि चार पैसे संसारालाही हातभार लावण्यासाठी येतील, या विचारातून मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा.लि. या कंपनीसाठी एजंट बनून नात्यागोत्यातील आप्तांचे पैसे गुंतवले. पण ठगवण्यात आले. आज माहेरी जावंसं वाटतं पण कुठल्या तोंडाने? आहे तिथेही तोंड लपवायला जागा नाही. गुंतवणूकदार कधी दारात उभा राहील, याचा नेम नाही. गुंतवणूकदारांचा धसका न कळत मुलांनीही घेतला आहे. त्यांनाही त्यांच्या मित्रांमध्ये त्यावरून चिडवले जाते, असे म्हणून अनेक महिलांनी अश्रू ढाळत वेदनांना वाट मोकळी करून दिली. प्रत्येकीची वेदना तशी एकच. शब्द जरी वेगळे असले तरी त्यातून व्यक्त होणारी तळतळ, आमचे पैसे आम्हाला मिळावेत, असा एकच आवाज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐकायला येत होता.

मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणात काही एजंटांनी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर नाशिक जिल्ह्य़ातील गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र एकटय़ा नाशिकमधील ग्राहकांना पैसे परत न करता सर्वच म्हणजे राज्यातील २७ लाख ग्राहकांनाही रक्कम थोडी-थोडी का होईना परत द्यावी, या मागणीसाठी मैत्रेय ग्राहक हक्क संरक्षण बचाव कृती समितीचे संघटक नाना साबळे यांच्या पुढाकाराने सुमारे एक हजार सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात सहभाग नोंदवण्यासाठी औरंगाबाद व जिल्ह्य़ातील अनेक एजंट, गुंतवणूकदार शेकडो महिला येथे आल्या होत्या. त्यांनी आपल्या वेदनांना या उपोषणातून वाट मोकळी करून दिली. गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचे कळताच येथील हडकोतील वानखेडेनगर येथील एका महिलेने विष प्राशन केले होते.

ही बचावलेली महिलाही या उपोषणात होती. शोभा रमेश तायडे यांनी तर हंबरडा फोडूनच आपबिती मांडली. माळुंजा येथील उषाबाई रमेश पंडुरे या मोलमजुरी करणाऱ्या महिलेने महिना ५०० रुपये देत तीन वर्षे गुंतवणूक केली. पाच वर्षांनंतर त्यांना ३६ तर सहा वर्षांनंतर ५६ हजार मिळणार होते.

पण हाती काहीच आले नाही, असे पाणावल्या डोळ्यांनी उषाबाईंनीही आपल्यावर बितलेला प्रसंग सांगितला. नंदा मुळे सांगत होत्या,‘धर्माबाद जवळ असलेल्या आंध्रप्रदेशातील कोंडलवाडी येथील मातीकाम करणाऱ्या लोकांचे पैसे गुंतवले आहेत. हातावरचे त्यांचे पोट. एवढय़ा दूपर्यंत जाऊन आम्ही गुंतवणूकदार केले. आता त्यांना कसे तोंड द्यायचे हा आम्हाला रोज सतावणारा प्रश्न. रंजना राजू सूर्यवंशी, ऊर्मिला राजेंद्र कोलते, पंचफुला साळुंके या हडकोतील महिलांनी व गुलमंडीतील शोभा फुलंब्रीकर यांनीही, प्रत्येकीने आठ वर्षांत सात ते दहा लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचे सांगून नातलगांचा विश्वास संपादन करून रक्कम गुंतवल्यामुळे माहेरी जायलाही जागा उरली नाही, करायला गेलो एक अन पदरी भलताच मनस्ताप पडल्याची वेदना व्यक्त केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maitreya plotters structures pvt ltd investment crime
First published on: 16-05-2017 at 02:31 IST