छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या पैठण तालुक्यातील दावरवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यावर दगडांनी हल्ला करून २५ लाख लुटल्याची घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ११ च्या सुमारास पैठण-पाचोड मार्गावर घडली होती. ग्रामीण पोलिसांनी २४ तासातच या लूटप्रकरणाचा छडा लावून चार आरोपींना अटक केली. यापैकी एक आरोपी पैसे भरण्यासाठी आला होता. तेथूनच पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरीत तिघांचाही ठावठिकाणा लागून चारही आरोपींकडून २५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली.

या प्रकरणातील घटनाक्रम पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी शनिवारी सायंकाळी तपशीलवार सांगितला. ते म्हणाले, पत्नीच्या मोबाइल नंबरमुळे सूत्रधार जाळ्यात अडकला. ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी या टोळीने कट रचून हा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोघे हे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

भारत राजेंद्र रूपेकर (३०, रा. नानेगाव, ता. पैठण) हा मुख्य आरोपी असून, विष्णू कल्याण बोधणे (२४, रा. नानेगाव), सचिन विठ्ठल सोलाट (२५, रा. राहुलनगर, जायकवाडी, ता. पैठण), विशाल दामोदर चांदणे (२४, रा. अखातखेडा, ता. पैठण), अशी उर्वरीत पोलिसांची नावे आहेत.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी (कार), रोख रक्कम आणि ८ मोबाइल जप्त केले आहेत, असे माहिती  डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेसाठी २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारे सेवानिवृत्त कर्मचारी गणेश आनंद पहिलवान (६५) हे स्कूटीवरून जात असताना दुचाकीवरील दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांनी स्कूटीला कट मारून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगड व लाथ मारून पहिलवान यांना खाली पाडून त्यांच्या हातातील २५ लाखांची बॅग हिसकावून घेतली आणि पसार झाले. सेवानिवृत्त कर्मचारी गणेश पहिलवान यांच्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अशी वाटणी केली रक्कमेची

मुख्य सूत्रधार भारत रूपेकर याने १० लाख रुपये स्वतः घेतले. विष्णू बोधणे, सचिन सोलाट व विशाल चांदणे यांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. लुटीचा प्लॅन भारतने आठ दिवस रेकी करून तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी रूपेकरने बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची स्लिप भरली. मात्र, त्याने स्वतःचा नव्हे, तर पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर टाकला होता. रूपेकरच्या स्वतःच्या गावात बँक असतानाही त्याने याच शाखेत व्यवहार का केला, यावरून पोलिसांचा संशय बळावला. दरोड्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरू केला, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व व्यवहारांच्या स्लिप तपासल्या. स्लिपवरील पत्नीच्या नंवरवरून पोलिसांनी रूपेकरला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.