छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील आंतरवली येथील मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली असली तरी त्यातून फारसे काही मिळाले नाही, असे सांगत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मराठवाडय़ात लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. बीड जिल्ह्यातही सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला. बंद दरम्यान सोमवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंदोलकांशी चर्चा केली.

‘राजकारण करू नका असे सांगता, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते, असा सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. खोटे बोलता येत नाही. तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करू,’ असे त्यांनी उपोषणस्थळी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून अर्जून खोतकर यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. दुपारी बैठकीनंतर पुन्हा गिरीश महाजन हे चर्चेला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा >>>सनातन धर्म मुद्दय़ावरून भाजप आक्रमक विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान; उदयनिधी स्टॅलिन यांच्या माफीची मागणी

दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच राहील, असे जरांगे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालकही जालना येथे पोहचले आहेत. सोमवारी गेवराईत पुन्हा राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तर परळीमध्ये सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर व हिंगोली जिल्ह्यातील बंद दरम्यान कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली. नांदेड येथे मोर्चात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नका, असे म्हणत परत पाठविले. सोमवारी मराठवाडय़ातील राज्य परिवहन मंडळाच्या बसची वाहतूक सुरू झाली नाही.

हेही वाचा >>>संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये पुन्हा ‘अदानी’?

समाजासाठी प्रसंगी पदाला लाथ मारू -शिंगणे

मी सरकारमध्ये आहे, सरकारजमा नाही. समाजासाठी प्रसंगी पदाला लाथ मारू, अशा स्पष्ट शब्दात अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सरकारला इशारा दिला. शिंगणे हे मराठा समाज बांधवांच्या मोर्चात बोलत होते. विशेष म्हणजे, बुलढाणा येथे रविवारी पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला शिंगणे गेले नाहीत. उलट त्याचवेळी ते मराठा समाज बांधवांच्या मोर्चात सहभागी झाले.

पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरूच

वाई , सोलापूर, कोल्हापूर : जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यासह सोलापूरमधील बार्शी, मोहोळ भागात आज बंद पाळण्यात आला. कोल्हापुरात उद्या (दि. ५) बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातही बंद

सातारा जिल्हा आणि शहरात आज बंद पाळण्यात आला. शहरातून दुचाकी रॅली काढून तीन पक्षांच्या या सरकारचा निषेध करण्यात आला. सातारा शहरासह तालुका, कोरेगाव लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण, मेढा, म्हसवड आदी ठिकाणी जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला. सातारा शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा >>>इस्लामी आक्रमणानंतरच भारतीय महिलांवर निर्बंध; रा. स्व. संघाच्या कृष्ण गोपाळ यांचा दावा

बार्शीत बंद

बार्शी शहर व तालुक्यासह मोहोळ व अन्य भागांत बंद पाळण्यात आला. एसटी बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासून बंदचा परिणाम दिसून आला. शाळा, महाविद्यालये वगळता बँकांसह अन्य संस्थांच्या कामकाजावर बंदचा परिणाम दिसून आला. वाहतूक सेवा, भाजी मंडई व इतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. एसटी बसेसची सेवाही बंद ठेवण्यात आली होती. बंद काळात रस्त्यांवर टायर जाळण्याचे प्रकार घडले.सांगली जिल्ह्यातही आंदोलने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पलूस येथे मोर्चा काढण्यात आला, . भिलवडी येथे दांडके मोर्चा काढण्यात आला. जत येथे महामार्गावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने गुहागर विजयपूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

कोल्हापुरात आज बंद

जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तीन पक्षांच्या या सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी हा निर्णय जाहीर केला