marathi language day maharashtra governor bhagat singh koshyari zws 70 | चाणक्यांशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराज कोण? राज्यपालांचे विधान | Loksatta

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराज कोण? राज्यपालांचे विधान

औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराज कोण? राज्यपालांचे विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (संग्रहीत छायाचित्र)

औरंगाबाद : सद्गुरूची देशात मोठी परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला त्याला सारे काही मिळाले. चाणक्यंशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार, असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

या वक्तव्यात चंद्रगुप्त किंवा शिवाजी यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही तर गुरूशिवाय काय होणार, असा त्याचा अर्थ असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असा मतप्रवाह असणारा मोठा वर्ग राज्यात आहे. औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, सत्ता स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साऱ्या चाव्या समर्थाना देण्याचीही तयारी दर्शविली होती, गुरू मिळणे आवश्यक आहे. कवी कालिदास, कवी तुळशीदास हे सर्वव्यापी आहेत. समर्थ रामदासांचे साहित्यही त्याच तोडीचे आहे पण त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आता गुरू शोधावा लागेल असेही ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना राम मंदिराचा शिलान्यास झाला. तेव्हा समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. ते असते तर म्हणाले असते, ‘आनंद वन भुवनी’ असेही राज्यपाल म्हणाले.

जेव्हा सत्तेत सर्वकाही चांगले असते तेव्हा मागेपुढे येणारे खूप असतात. शिवमधील इकार काढला की शव होते. शक्ती महत्त्वाची असते असे सांगत त्यांनी मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रातील समाजमन घडविण्यात समर्थ रामदासाची  शिकवणूक महत्त्वपूर्ण राहिली असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरांपासून  मराठी भाषेला संत साहित्याची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे.  त्यामध्ये  समर्थ रामदासांच्या साहित्याचे स्थान महत्त्वाचे आहे. समर्थानी, ‘‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’’, ‘‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’’,‘‘जनी िनद्यते ते सर्व सोडूनी द्यावे’’ या आणि यांसारख्या एकापेक्षा एक सरस रचनेतून मानवी जीवनात सदाचाराचे असलेले महत्त्व वारंवार अधोरेखित केलेले आहे. यातील सदाचरण महत्त्वाचे असते असेही ते म्हणाले. अन्यथा बलाढय़ रावणासमोर राम विजयी होण्यामागे त्याचे सदाचरणच कारणीभूत होते असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2022 at 00:24 IST
Next Story
VIDEO: “समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य