|| सुहास सरदेशमुख

करोनाबाधित मृतांवर अंत्यविधीसाठी पुढे आलेली ‘मस्तान’ संस्था

औरंगाबाद : करोना विषाणू साथीने अनेक गंभीर समस्या निर्माण केल्या. त्या सोडवण्यासाठी सेवाभावी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या. अनेक नवे मदत समूह स्थापन झाले. कुणी गरिबांना अन्नधान्याचे वाटप केले. कुणी रुग्णांच्या उपचारखर्चाचा भार उचलला. कुणी रुग्णाच्या जाण्याने कोलमडलेल्या नातलगांना आधार दिला. परंतु या साथीत मोठा प्रश्न उभा राहिला तो मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा. औरंगाबादमधील ‘मस्तान सेवाभावी संस्थे’च्या तरुणांनी हे आव्हान स्वीकारले आणि आजपर्यंत तीन हजारांहून अधिक करोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

पूर्वी औरंगाबादमधील बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लीम तरुणांचा गट काम करायचा. ही मंडळी करोनाकाळात अधिक सक्रिय झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सुरेश हरबडे यांनी साथरोगाच्या काळातील संसर्गाचे धोके आणि या कामाची गरज संवेदनशील मस्तान सेवाभावी संस्थेतील तरुणांना सांगितली. त्यानंतर या संस्थेने या कार्यात स्वत:ला वाहून घेतले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने अलीकडेच संस्थेचे प्रमुख बाबा मस्तान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मृत्यूची वेळ कुणालाही न चुकणारी आहे. मग अशा संकटकाळात सहकार्य करायचे नाही तर कधी, असा प्रश्न विचारत जगण्यातले पुण्य कमावायचे म्हणून हा गट करोना रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देतो.

सामाजिक आणि पुण्याचे म्हणून आधी केले जाणारे काम करोनाकाळात वाढविताना शहरातील तरुण व्यावसायिकांनी दररोज रात्री बैठका घेण्याचे ठरविले. कोणत्या खासगी रुग्णालयाकडे कुणी जायचे, कोणती वाहने वापराची, हिंदू अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे, ती पेटविण्यासाठी डिझेल याची तजवीज केली जायची. मुस्लीम व्यक्तीसाठी कफन, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारच्या पद्धतीत मौलवी किंवा किरवंत येतील का याची चाचपणी, अशी अनेक कामे बाबा मस्तान आणि त्यांचे सहकारी करू लागले.

एका बाजूला पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी औद्योगिक संघटना प्रयत्न करत होत्या. काही आमदारांनी कोविड काळजी केंद्र सुरू केले. काही आमदारांनी प्राणवायू सुविधेसह रुग्णालयही उभारले. पण अशी मदत उभी करताना अनेकांची वेळ उलटून गेली होती. बरेच जण न मिळणारी औषधे मिळवून देण्यासाठी झटापट करत होती. जगण्या-मरण्याच्या या लढ्यात सरकारी आर्थिक मदतीशिवाय औरंगाबादमधील एक गट अंत्यविधी नीट व्हावेत यासाठी झटत होता. हे सारे करताना ज्याच्या घरात मृत्यू झाला आहे त्या घरातील लोकांना मानसिक आधार देण्याचे कामही हे तरुण करत होते.

सेवेसाठी तत्पर…    दिवसाला ३० किंवा त्यापेक्षा अधिक अंत्यसंस्कारही संस्थेला करावे लागले. पहिल्या दोन-तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना भीती वाटली. पण पुढे काळजी घेऊन ही सेवा देण्यासाठी तरुण पुढे येत गेले. अनेकांनी मस्तान बाबा सेवा संस्थेतील युवकांना दूरध्वनी केले. त्यांना संस्थेने आर्थिक मदतही केली. या सेवेत येणारे बहुतांश जण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मालमत्ता विक्री, चप्पल-बुटाचे व्यापारी, वाहतूक क्षेत्रातील तरुण या संस्थेबरोबर काम करतात. महामार्गांवरून स्थलांतर करणाऱ्या मजुरांना संस्थेने पादत्राणांची व्यवस्थाही केली.

मानवता हाच धर्म…  मानवता हाच धर्म मानत करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन हजारांहून अधिक जणांचे अंत्यसंस्कार बाबा मस्तान आणि त्यांच्या ७०हून अधिक मित्रांनी केले. धर्म-पंथांच्या अंत्यसंस्काराच्या विधी काटेकोर पाळून काम करणाऱ्या या तरुणांचे कौतुक केले जात आहे.