छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, अशी भूमिका शरद पवारांनी जाहीरपणे मांडली. आरक्षण द्यायला त्यांचा विरोध होता. मात्र, त्यावर मनोज जरांगे पाटील का बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का, असाही प्रश्न विखे पाटील यांनी केला.
फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ते न्यायालयात टीकवण्याचेही काम करण्यात आले. मात्र, केवळ जातीयवादी भूमिकेतून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुळजापूरमध्ये ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून काय उपयो, असे ते म्हणाले.
शरद पवारांवर टीका
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरही या वेळी टीका केली. ज्येष्ठ नेत्यांनी ज्येष्ठता सोडून दिली आहे. वयाने ज्येष्ठता येत नाही. वडील बाळासाहेब पाटील यांच्या १९९१ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतपेट्या बनवण्यापासून मतपत्रिका बदलण्यापर्यंत कशी भानगड केली गेली. त्या वेळी पवार यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना कशा बढत्या मिळाल्या, हेही कळाले आहे. त्यांना जसे दोन लोक भेटतात, तसे मलाही दोन भेटतात, असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.