अतिरिक्त कामाच्या ताणामुळे  हिंगोलीत चालकाचा मृत्यू, बीडमध्ये १२१ कर्मचारी निलंबित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका बसला. बसफेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. हिंगोलीमध्ये संपामुळे अतिरिक्त कामाच्या ताणामुळे भास्कर अवचार या चालकाचा मृत्यू झाला. तर बीडमध्ये संप मोडून काढण्यासाठी विभाग नियंत्रकांनी तब्बल १२१ जणांना निलंबित केल्यामुळे खळबळ उडाली. औरंगाबाद शहरात संपादरम्यान कर्मचाऱ्यांनी सरकार आणि परिवहनमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने खासगी वाहतूक करणाऱ्यांनी त्यांचे दर दुपटीने वाढवले आहेत.

हिंगोलीतील भास्कर अवचार यांना हिंगोली-रिसोड अशी फेरी गेल्या दोन दिवसांपासून दिली जात होती. शनिवारी ते परतल्यानंतर दिसऱ्या दिवशी पुन्हा बस चालवा असा आग्रह धरला जात होता. तसे न केल्यास सोलापूरला बस घेऊन जावी लागेल, असे धमकावण्यात आले. त्याचा ताण वाढल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपात सहभागी न झालेले कर्मचारीही पुन्हा संपात सहभागी झाले. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली. परभणी जिल्ह्यात जिंतुर, पाथरी या तालुक्यांमध्ये कडकडीत संप झाला. परभणी-सेलूदरम्यान फेऱ्या नियमित सुरू होत्या. मात्र, गंगाखेडहून सोनपेठकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. गंगाखेड आगारातून बस सुटल्याच नाही.

बीड जिल्ह्य़ात दिवसभरात ७८७ फेऱ्या होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ३५ बस विभागातून बाहेर पडल्या. दोन दिवसांत दीड हजार

फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशांचे हाल झाल्याने बीड बस स्थानकातील शिवशाही बसवर   (एमएच०३-टीव्ही४४१३) जमावाने दगडफेक केली. कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिल्याने विभागनियंत्रक गौतम जगतकर यांनी १२१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. लातूरमध्येही ९० टक्के बससेवा ठप्प होती. बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाले होते. उस्मानाबादमध्येही अशीच स्थिती होती.

सांगलीत हिंसक वळण, दगडफेकीत चालकासह दोघे जखमी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज दुसऱ्या दिवशी शनिवारी जिल्ह्यत पाच ठिकाणी दगडफेक झाल्याने िहसक वळण लागले. या दगडफेकीत चालकासह दोघे जखमी झाले. तासगाव तालुक्यात पुणदी येथे अज्ञाताकडून झालेल्या दगडफेकीत चालकासह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून संप सुरू केला असून आज संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणदी ता. तासगाव येथे एका अज्ञाताने सांगलीहून आटपाडीला जात असलेल्या बसवर (एमएच १४ बीटी ०९८७) दगडफेक केली. यामध्ये चालकासमोरच्या काचेचे नुकसान झाले असून चालकासह एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. तर पुण्याहून सांगलीला येत असलेल्या शिवशाही बसवर वाळव्यानजीक अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये चालकाच्या बाजूला असलेल्या खिडकीची काच फुटली आहे. याशिवाय अन्य तीन मार्गावरील बसगाडय़ांवरही दगडफेक करण्यात आली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc workers strike aurangabad
First published on: 10-06-2018 at 02:31 IST