छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान घरकुल योजनेतील चार हजार ६०० कोटी रुपयांच्या निविदा घोटाळय़ात महापालिकेच्या उपायुक्त तथा योजनेच्या कक्षप्रमुख अपर्णा थिटे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून, त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान, या प्रकरणातील घोटाळय़ातील आरोपींकडून, तसेच महापालिकेतील या योजनेसंदर्भातील कागदपत्रे छाप्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतली आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतील ३९ हजार ७०० घरकुल उभे करण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागा व त्याचे प्रस्ताव तयार करण्यापासून सारे काही ढिसाळ कारभाराचा भाग होता. जेथे पुरेशी जागाच नाही अशी ठिकाणे देण्यापासून ते योजनेचा निधी परत जाऊ नये म्हणून सतत कागदी कसरती करणाऱ्या प्रशासनाने आर्थिक क्षमता नसणाऱ्या समरथ कन्स्ट्रक्शन कंपनीस कंत्राट देण्याचा घेतलेला निर्णय आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गळय़ाशी येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तीन कंपन्यांतील आरोपींच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर महापालिकेतील उपायुक्तांनाही याप्रकरणी समन्स बजावले आहे. सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या समन्सच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेचे अधिकारी सोमवारी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश महापालिकेतील संबंधितास देण्याच्या सूचना दिल्याचे महापालिका आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.