जिल्हय़ातील नगरपंचायत अध्यक्षपद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीत नवाब खान, तर पाटोद्यात मनीषा पोटे व शिरूरमध्ये रोहिदास पाटील यांची वर्णी लागली. काठावरच्या बहुमतामुळे सर्वाचे लक्ष वेधलेल्या वडवणीतील नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या मंगल राजाभाऊ मुंडे यांनी विजय मिळवून वर्चस्व कायम ठेवले. चार पंचायतींतील आठ पदाधिकारी निवडीत पुरुषांबरोबर महिलांना समान संधी मिळाली.
जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर व वडवणी या चार नगरपंचायत निवडणुकीनंतर शुक्रवारी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या. तीन ठिकाणी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असल्याने माजी मंत्री सुरेश धस यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली, तर वडवणीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे आणि काही सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा असल्याने या निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी वर्चस्व कायम राखले.
नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या मंगल राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या गयाबाई आळणे आणि उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वर्षां वारे यांनी अपक्ष लतिका उजगरे यांचा पराभव केला. त्यामुळे वडवणीच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मंगल मुंडे यांना मिळाला. आष्टीत अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नवाब खान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी शकुंतला सुरवसे यांची वर्णी लागली. पाटोद्यात राष्ट्रवादीच्या मनीषा पोटे, तर उपनगराध्यक्षपदी नय्युम पठाण आणि शिरूरकासारमध्ये राष्ट्रवादीचेच रोहिदास पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी बाबुराव झिरपे यांची वर्णी लागली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीची ३, भाजपची एका नगरपंचायतीत सत्ता
जिल्हय़ातील नगरपंचायत अध्यक्षपद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीत नवाब खान, तर पाटोद्यात मनीषा पोटे व शिरूरमध्ये रोहिदास पाटील यांची वर्णी लागली.
Written by बबन मिंडे
First published on: 28-11-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar panchayat result in beed